
पुणे : शहरातील विविध गणेश मंडळांनी ‘सकाळ’च्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या बैठकीत उत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या. ‘उत्सव सर्वांचा आहे, तर नियमही सर्वांसाठी समान हवेत’, अशी स्पष्ट भूमिका मांडत मंडळांनी मिरवणूक मार्ग, ध्वनिवर्धकाबाबत परवानगी, देखावे सादर करण्याचा कालावधी, वाहतूक कोंडी, पोलिस बंदोबस्त, महिलांची सुरक्षितता याबाबत महापालिका आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावावर बोट ठेवले. विसर्जनापुरतेच नव्हे, तर उत्सवाच्या १० दिवसांत प्रशासनाने सतत संपर्कात राहावे, अशी आग्रही भूमिका बहुसंख्य मंडळांनी घेतली. नियोजन एकसंध असावे, तरच पुण्याचा गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक ठरेल, असाही सूर बैठकीत उमटला.