अजितदादांच्या या दूरदृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा लाभ

कल्याण पाचांगणे
Thursday, 10 September 2020

जमीन सुधारण्यासाठी हरियाना, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात क्षारपड जमिनीबाबत युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. त्याची दखल घेत अजित पवार यांनीही काम हाती घेतले आहे

 माळेगाव (पुणे) : पश्‍चिम महाराष्ट्रात बागायती क्षेत्र अधिक आहे. मात्र, पाणी निचरा न होणे, रासायनिक खतांचा बेसुमार वापरामुळे हजारो एकर क्षेत्र क्षारपड असल्याची सरकारी आकडेवारी सांगते. अशा जमिनी समूळ नष्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. त्याच्या पथदर्शी प्रकल्पाच्या उद्देशाने बारामतीत लोकसहभागातून पाटबंधारे व जलनिस्सारण उपविभागांतर्गंत सुमारे शंभर किलोमीटर चर स्वच्छतेचा (गाळ व गवत काढणे) कार्यक्रम यशस्वी केला आहे. या कामामुळे शिवारासह वाडीवस्तीत शिरणाऱ्या पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा होताना दिसतो. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जमीन सुधारण्यासाठी हरियाना, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात क्षारपड जमिनीबाबत युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. त्याची दखल घेत अजित पवार यांनीही काम हाती घेतले आहे. नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात एकूण 78 चर योजना आहेत. त्यांची एकूण लांबी 376 किलोमीटर आहे. त्यापैकी बारामती तालुक्‍यात 61 चर योजनांमध्ये (लांबी 263 किलोमीटर) गाळ व झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. शासनस्तरावर निधीचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांची मागणी असूनही सदरची चर स्वच्छतेची कामे होत नव्हती. परिणामी क्षारपड जमिनीचे प्रमाण लक्षणीय वाढत चालले होते. शिवाय पावसाचे अतिरिक्त पाणी वाडीवस्त्यांमध्ये शिरण्याचा धोकाही वाढलेला होता. गावांतर्गत पक्के रस्तेही उघडले जात होते. 

कोरोनाबाधितांसाठी कॅशलेस सेवा, पण लूट सुरूच

या समस्यांचा विचार करून अजित पवार यांनी हे पथदर्शी काम एप्रिल, मे महिन्यात हाती घेतले होते. तालुक्‍यातील जेसीबी, पॉकलेन आदी मशनरी असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील उद्योजकांच्या मदतीने तब्बल शंभर किलोमीटर लांबीच्या चर योजना स्वच्छ करून घेतल्या. त्यामध्ये माळेगाव, सांगवी, नीरावागज, सोनगाव, पिंपळी, गुनवडी, खांडज, घाडगेवाडी, निंबूत कोऱ्हाळे, होळ, लाटे, शिरष्णे, मुरूम आदी गावच्या हद्दीचा समावेश आहे. अधीक्षक अभियंता बी. जी. गाडे, कार्यकारी अभियंता म. रा. अवलगावकर, उपविभागीय अधिकारी अंकुश निकम, सहायक अभियंता नितीन खाडे, शाखा अभियंता रवींद्र जगताप, विनोद हिंगाणे, विनोद सूर्यवंशी, रियाज शेख आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनीही समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. 

बारामती तालुक्‍यात चर योजनांची स्वच्छतेची कामे झाल्यामुळे शेतीत अनेक ठिकाणी नव्याने रस्ते अस्तित्वात आले. तसेच, शिवाराबरोबर वाडीवस्तीमधील अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा होण्यास सुरूवात झाल्याने संबंधित गावकऱ्यांनी समाधान व्यक केले आहे. 

शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर बहुतांशी शेतकऱ्यांचे प्रपंच अवलंबून आहेत. त्यामुळे क्षारपड जमिनी वाढणारी समस्या ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रगती खुंटणारी गोष्ट आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पुढाकारातून चर स्वच्छतेची झालेली कामे सर्वार्थाने फायद्याची व समाधानकारक ठरत आहेत. 
- राजेंद्र जाधव, शेतकरी, बारामती 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred kilometers of canal cleaning program successful with public participation in Baramati