मांजरी-वाघोली रस्त्याच्या कामाने अखेर घेतला एक बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

one killed in Manjari wagholi road accident pune

मांजरी-वाघोली रस्त्याच्या कामाने अखेर घेतला एक बळी

मांजरी : रस्त्याच्या कामातील धोका व असुरक्षितता निदर्शनास आणूनही अधिकारी व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे येथील रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ईश्वरकुमार राजेंद्रकुमार पुनिया (वय २८, रा. देहूगाव, पुणे. मूळ रा. शेगांव, बुलढाणा) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. शनिवारी (ता. ९) पाहटेच्या सुमारास हा अपघात झाला. ईश्वरकुमार मोटारसायकलवरून मांजरी बुद्रुककडून वाघोलीच्या दिशेने जात होता. येथील स्मशानभूमीच्या अलिकडील वळणावर रस्ता लक्षात न आल्याने मोटारसायकलसह तो डाव्याबाजूला खड्ड्यात पडला.

सकाळी त्याठिकाणी नागरिकांना हा तरूण पडलेला दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता तो मृत झाल्याचे समजले. दरम्यान, अपघातात आणखी एक तरूण जखमी झाला असल्याचे समजत आहे. तो देहू येथील रूग्णालयात उपचार घेत आहे. त्याचा तपास हडपसर पोलीस करीत आहेत. पीएमआरडीएकडून मांजरी-वाघोली रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रीटीकरणचे काम केले जात आहे. हे काम करताना वाहतूक सुरक्षेची आजिबात काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. धोक्याच्या सूचना, सिग्नल, रिफ्लेक्टर, सेवा व पर्यायी रस्त्याचे फलक लावलेले नाहीत. प्रवासी व नागरिकांनी वारंवार निदर्शनास आणूनही अधिकारी व ठेकेदारांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे दररोजच या मार्गावर छोटेमोठे अपघात होत आहेत. सकाळनेही दोन वेळा या निष्काळजीपणाबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. अधिकाऱ्यांकडून त्या त्या वेळी काळजी घेण्याचे अश्वासन दिले.

मात्र, प्रत्यक्षात सुरक्षीत वाहतुकीची कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. शनिवारी (ता. ९) झालेल्या अपघातात याच निष्काळजीपणामुळे बळी गेल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. रस्त्याचे काम करीत असताना वाहतुकीच्या सुरक्षेबाबत विविध माध्यमातून वारंवार कल्पना देऊनही ठेकेदार व अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. वाहतूक पोलिसांनीही याबाबत निष्काळजीपणा दाखविल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधीत सर्वांना या घटनेस जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मांजराईनगर नागरिक कृतीसमितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे, अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर व जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता ननावरे यांनी केली आहे. दरम्यान, पीएमआरडीएचे कनिष्ठ अभियंता स्वरूप शिरगुप्पे यांच्याशी कालपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: One Killed In Manjari Wagholi Road Accident Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top