हिंजवडीत दररोज सव्वालाख वाहने 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील ठराविक रस्त्यांवर रहदारी वाढत असल्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यात नगर रस्त्याने सर्वाधिक रहदारी असून, त्या खालोखाल हिंजवडी परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे. नगर रस्त्याने दररोज एक लाख 38 हजार, तर हिंजवडीत एक लाख 13 हजार वाहनांची ये-जा सुरू असते. हे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर भर दिला जाणार आहे. 

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका; खडकी, पुणे व देहूरोड कॅन्टोन्मेंट; तळेगाव दाभाडे, चाकण, आळंदी नगरपालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील गावांचा झपाट्याने विकास होत आहे.

या गावांच्या विस्तारासह वाहनांची संख्याही वाढत असल्याने रहदारी वाढली आहे. त्यात सुसूत्रता यावी, यासाठी पीएमआरडीएने सल्लागार कंपनीच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रातील रस्ते व त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा सर्वे केला आहे. त्यानुसार सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. पीएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणात पुणे-नगर रस्त्याने सर्वाधिक वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले आहे. त्या खालोखाल हिंजवडीचा क्रमांक लागतो. 

हिंजवडी महत्त्वाचे 
आयटी पार्कमुळे हिंजवडीत येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. त्यातून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एकेरी वाहतुकीचा दोन वेळा प्रयोग केला. त्या वेळी हिंजवडीचा समावेश पुणे आयुक्तालयात होता. आता पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अस्तित्वात आल्यानंतर पोलिस आयुक्त आर. पद्मनाभन यांनी हिंजवडीत चक्राकार वाहतुकीचा प्रयोग सुरू केला आहे. हा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. पूर्वीप्रमाणे वाहतूक कोंडी होत नसल्याचे चित्र हिंजवडीतील रस्त्यांवर आहे. 

हिंजवडी कनेक्‍ट रस्ते 
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला डांगे चौक, जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, वाकड, देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग, म्हाळुंगे- बालेवाडी व बाणेर मार्गे या रस्त्यांनी हिंजवडी जोडले आहे. मावळ तालुक्‍यातून कासारसाई मार्गे आणि मुळशी तालुक्‍यातून घोटावळे मार्गे हिंजवडीला जाता येते. बहुतांश रहदारी पिंपरी-चिंचवड व पुण्याला जोडणाऱ्या रस्त्यांनी सुरू आहे. 

दृष्टिक्षेपात वाहनांची टक्केवारी 
वाहनाचा प्रकार टक्केवारी 
दुचाकी 60.5 
मोटारी 23.2 
प्रवासी 2.2 
मालवाहू 9.9 
पीएमपी 3.4 
सायकल 0.7 
इतर 0.1 

सर्वंकष वाहतूक आराखड्यामध्ये रेल्वे व बस या सार्वजनिक वाहतूक योजनांवर भर दिला आहे. सध्या एकूण वाहतूक वर्दळीत 71 टक्के वाटा खासगी मोटारी व दुचाकींचा असून, 29 टक्के वाटा बस व रिक्षा या सार्वजनिक वाहनांचा आहे. येत्या 20 वर्षांत सार्वजनिक वाहतुकीचा वाटा 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 
- किरण गित्ते, आयुक्‍त, पीएमआरडीए 

Web Title: one lac Twenty five thousand daily vehicles in Hinjewadi