पुण्यात लाखभर ज्येष्ठ लसीविना; २.७१ लाख ज्येष्ठांनी घेतला पहिला डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात लाखभर ज्येष्ठ लसीविना; २.७१ लाख ज्येष्ठांनी घेतला पहिला डोस

पुण्यात लाखभर ज्येष्ठ लसीविना; २.७१ लाख ज्येष्ठांनी घेतला पहिला डोस

पुणे : कोरोनाची बाधा होऊन त्यात ज्येष्ठांचा मृत्यू होत असल्याने केंद्र सरकारने १ मार्च पासून ६० पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू केले. गेल्या दोन महिन्यात पुणे शहरातील २ लाख ७१ हजार ९६७ ज्येष्ठांनी एक लसीचा एक डोस घेतला आहे. मात्र, अद्यापही एक लाख पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लसच घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यातच लसीचा अपुरा पुरवठा, लसीकरण केंद्रांवरील लांबच्या लांब रागांमुळे लस घेणे ज्येष्ठांना अवघड होत असल्याचे वास्तव आहे.

देशात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सुरवातीच्या टप्प्यात लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये गैरसमज होते, त्यामुळे लसीकरणाला प्रतिसाद नव्हता, पण आता केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. महापालिकेकडील माहितीनासुर शहरात ३ लाख ८० हजार ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्यावर शारीरिक हालचलावीर असलेली मर्यादा, विविध आजारांमुळे आलेला अशक्तपणा यामुळे त्यांचे लसीकरण करून घेणे आव्हान आहे. १ मार्च ते १० मे या कालावधित शहरातील २ लाख ७१ हजार ९६७ ज्येष्ठांनी पहिला डोस घेतला आहे. तर १ लाख ८ हजार १९३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ज्या ज्येष्ठांचे दोन्ही डोस झाले आहेत अशांची चिंता मिटली असली तरी अद्याप १लाख ९ हजार जणांनी अजून पर्यंत लसीकरण मोहिमेतच सहभाग घेतलेला नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे महापालिकेपुढे आव्हान आहे.

हेही वाचा: भिगवण येथील रुग्णांचे हाल; आरोग्य विभागाची विलगीकरण कक्षाकडे पाठ

९ लाख डोसचे वितरण

केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला मिळालेल्या डोसनुसार आत्तापर्यंत सर्व गटातील पहिला व दुसरा डोस मिळून ९ लाख २१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

शहरात १८ ते ४४ सुमारे २२ लाख, ४५ ते ५९ सुमारे ५.७० लाख आणि ६० च्या पुढची लोकसंख्या ३.८० लाख म्हणजे सुमारे ३१ लाख लोकसंख्या लसीकरणासाठी पात्र आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ९ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. महापालिकेला अजून किमान ५४ लाख डोसची गरज पडणार आहे.

‘‘शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुण्याला लस उपलब्ध व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सर्वच नागरिकांचे लसीकरण लवकर व्हावे यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे.’’

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

हेही वाचा: बारामतीतील कडक लॉकडाउनची १८ मेपर्यंत वाढली मुदत

‘‘लसीकरणात ज्येष्ठ नागरिकांची परवड सुरू आहे. ज्येष्ठांना कोरोनाची लागण लवकर होण्याची शक्यता असल्याने लसीकरणात त्यांना प्राधान्य द्यावे. त्रास

कमी करण्यासाठी लसीकरण केंद्रांवर सुविधा द्याव्यात.’’

- अरुण रोडे, अध्यक्ष, फेसकॉम

ज्येष्ठांना येणाऱ्या अडचणी

- लसीकरण केंद्रावर किमान तीन तास उभे राहावे लागणे

- आजारपण व अशक्तपणा यामुळे रांगेत थांबणे अवघड

- केंद्रावर जाऊनही लस मिळेलच याची शाश्‍वती नाही

- लसीची खात्री व रांगेत उभे राहण्याचा वेळ कमी होणे गरजेचे

शहरातील लसीकरणाची स्थिती

गट - पहिला डोस - दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी - ५८७७३ - ४४९२८

फ्रंटलाइन कर्मचारी - ६६५५२ - २२४१७

ज्येष्ठ नागरिक - २७१९६७ - १०८१९३

४४ ते ५९ वयोगट - २७३५५८ - ३७९९८

१८ ते ४४ वयोगट - १५५९५ - ०००००

Web Title: One Lakh Senior Citizens In Pune Without Vaccines The First Dose Senior

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top