
Pune News : विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना
पुणे : परीक्षा विभागाशी निगडित अनेक अडचणींसाठी विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठच गाठावे लागते. महाविद्यालय स्तरावर मदत न मिळाल्याने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना येथेही तशीच वागणूक मिळते.
विद्यार्थ्यांच्या अशा तक्रारींच्या निवारणासाठी विद्यापीठात एक खिडकी योजना असावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी बुधवारी बैठकीत केली. कुलगुरूंनीही या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत, एक खिडकी योजना आणि फाइल ट्रेकिंग सिस्टम राबविणार असल्याचे स्पष्ट केले.
विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाच्या आर्थिक लेख्यांना अधिसभेची मान्यता आवश्यकता असते. मात्र अद्याप अधिसभा पूर्ण क्षमतेने अस्तित्वात आलेली नसताना केवळ प्रशासकीय औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विद्यापीठातर्फे अधिसभा घेण्यात आली.
यावेळी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह नवनिर्वाचित अधिसभा सदस्य या अधिसभेला उपस्थित होते. बैठकीत आर्थिक लेख्यांसह परीक्षांबाबत चर्चा करण्यात आली. परीक्षा विभागातील अडचणींसंदर्भात राहुल पाखरे, सचिन गोर्डे पाटील यांनी आयत्यावेळीचा विषय मांडला.
यावर बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. अपूर्व हिरे आदींनी परीक्षा विभागाच्या कारभाराबाबत उपस्थित केला. त्यामुळे प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली अल्प आणि दीर्घ मुदतीच्या प्रश्नांवर उपाय सुचविण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात तातडीने करायच्या उपाययोजनांबाबत दहा दिवसांत, तर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दीर्घकालीन उपाय करण्यासाठीचा अहवाल महिन्याभरात सादर करण्यात येईल.
विद्यापीठात ‘जी २०’
विद्यापीठात जी-२० परिषदेशी संबंधित अर्थविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. युवा-२० या कार्यक्रमासाठी विद्यापीठाची निवड झाली असून, केंद्रीय समित्यांनी या संबंधीची पाहणी पूर्ण केल्याची माहिती कुलगुरू डॉ. काळे यांनी दिली. अर्थविषयक समितीच्या महत्त्वपूर्ण बैठक विद्यापीठात पार पडणार आहे.
त्याचा समन्वय आणि नियंत्रणाची जबाबदारी विद्यापीठावर सोपवण्यात आली आहे. हवामान बदलाची मध्यवर्ती कल्पना विद्यापीठाने स्वीकारल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. जी-२० परिषद समजून घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात येणार असल्याचेही कुलगुरूंनी सांगितले. तर जी-२० परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थी आणि नवउद्योजकांना फायदा होऊ शकेल अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे, विद्यापीठ स्तरावर कार्यक्रमांच्या आयोजनासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना अधिसभा सदस्यांनी केली.
निश्चितच परीक्षा विभागातील कामकाजात सुधारणा आवश्यकता आहे. त्याचबरोबर महाविद्यालयांकडूनही अनेकदा अंतर्गत गुण भरले जात नाही. त्यामुळे निकालात अडथळा निर्माण होतो. महाविद्यालये विनाकारण विद्यार्थ्यांना विद्यापीठात पाठवत असतात, त्यांनीही शिस्त पाळणे गरजेचे आहे.
-डॉ. संजीव सोनावणे, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
कागदपत्रासंबंधीच्या तक्रारी टाळण्यासाठी विद्यापीठात फाइल मेकिंग, ट्रेकिंग आणि अॅक्सेस कंट्रोल सिस्टम लवकरच उभारण्यात येईल. आम्ही ऑनलाइन डॉक्युमेंट सिस्टम विकसित करत असून, त्याला संलग्न महाविद्यालये आणि संस्थांना लिंक करण्यात येईल.
- प्रा. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ