

पिंपळगाव बसवंतमध्ये १,००० ते ३,५५२ रुपये
ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या सप्ताहात कांद्याच्या आवकेत चढ-उतार राहिले. ६ ते १२ ऑगस्टदरम्यान दररोज साधारण ८ हजार ते २० हजार क्विंटलदरम्यान कांद्याची आवक झाली. सप्ताहाच्या सुरुवातीला तुलनेने मोठी असलेली आवक अखेरीस कमी झाल्याने बाजारभावाला आधार मिळाल्याचे चित्र आहे. बुधवार (ता. १२) रोजी ८,४५० क्विंटल आवक झाली आणि कांद्याला कमाल ३,५५२ रुपये, तर सर्वसाधारण २,६५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
सप्ताहाच्या सुरुवातीला ६ ऑगस्टला १८,०८० क्विंटल कांदा बाजारात आला. त्यावेळी किमान ५००, कमाल ३,१०९ आणि सर्वसाधारण २,३०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. ७ ऑगस्ट रोजी आवक १७,०४४ क्विंटल राहिली. दरम्यान, कमाल दर ३,४७३ रुपयांपर्यंत पोहोचला आणि सर्वसाधारण दर २,४०० रुपये झाला. ८ ऑगस्ट रोजी १६,७४५ क्विंटल आवक झाली असता कमाल दर ३,३०० रुपये आणि सर्वसाधारण दर २,४५१ रुपये होता. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी आवक १८,८६२ क्विंटल झाली. या दिवशी सर्वसाधारण दर २,५५० रुपये, तर कमाल दर ३,४७१ रुपये राहिला. ११ ऑगस्ट रोजी सप्ताहातील सर्वाधिक २०,१०८ क्विंटल आवक झाली. मात्र, मोठ्या आवकेचा परिणाम दरावर होऊन सर्वसाधारण दर २,६०० रुपयांवर स्थिरावला.यानंतर १२ ऑगस्टला आवक थेट ८,४५० क्विंटलवर आली.
आवकेत झालेल्या या लक्षणीय घटीसोबत कमाल दर ३,५५२ रुपयांपर्यंत वाढला आणि सर्वसाधारण दरही २,६५० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच ६ ऑगस्टच्या तुलनेत सर्वसाधारण दरात ३५० रुपयांची वाढ झाली आहे.
आवक-दरातील संबंध स्पष्ट सप्ताहातील बाजारचित्र पाहता आवक वाढली की दरावर दबाव आणि आवक घटली की दराला आधार मिळत असल्याचे दिसते. ११ ऑगस्ट रोजी २० हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक असताना सर्वसाधारण दर २,६०० रुपये होता; तर दुसऱ्याच दिवशी आवक निम्म्यापेक्षा कमी झाल्यानंतर सर्वसाधारण दर २,६५० रुपये झाला. मात्र, केवळ आवक नव्हे तर कांद्याची प्रत, आकार, गुणवत्ता आणि बाजारातील मागणी यांचाही दरनिर्धारणावर परिणाम होत असल्याने कमाल दरातील चढ-उतार होत आहे.
-----------
चौकट
प्रमुख बाजारांमध्येही सरासरी दर २,५०० रुपयांच्या पुढे
१२ ऑगस्ट रोजी कांद्याच्या प्रमुख बाजारांमध्ये लासलगाव येथे ८,५६४ क्विंटल आवकेला ८०० ते ३,००१ रुपये दर मिळाला असून सर्वसाधारण दर २,६८५ रुपये राहिला. विंचूर (लासलगाव) येथे ५,४७० क्विंटल आवकेला ६०० ते २,९५३ रुपये आणि सर्वसाधारण २,६०० रुपये दर होता. येवला येथे ६,१४९ क्विंटल आवकेला ६०० ते ३,००१ रुपये आणि सर्वसाधारण २,६५० रुपये दर मिळाला. उमराणेत ९,५०० क्विंटल आवकेला ९०० ते ३,०५१ रुपये आणि सर्वसाधारण २,५०० रुपये, तर मनमाड येथे २,१४२ क्विंटल आवकेला ४४८ ते २,९५१ रुपये आणि सर्वसाधारण २,६५० रुपये दर राहिला. एकूणच, प्रमुख बाजारांमध्ये सर्वसाधारण दर २,५०० ते २,६८५ रुपयांच्या पट्ट्यात असल्याने कांद्याच्या बाजाराला सध्या तुलनेने चांगला आधार मिळत असल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.