कांद्याच्या वाढत्या भावाने सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया

Onion
Onion

पौडरस्ता - कांद्याचे वाढते भाव आणि त्याबद्दल येणाऱ्या विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘कांदा कापला की पूर्वी डोळ्यांत पाणी यायचे, आता किंमत ऐकली तरी डोळे पाणवतात,’ ‘आमच्याकडे खास बनवलेले कांद्याचे दागिने मिळतील- कांदे ज्वेलर्स.. ’ अशा प्रकारचे मेसेज येत असतानाच आता सविनय कांदा सत्याग्रहाची चळवळही आकारास येत आहे.

‘नो ओनियन मंथ’ (कांदेविरहित महिना) या नावाने एक पोस्ट सध्या व्हॉटसॲपवर फिरत आहे. त्यामध्ये जपानमधील नागरिक अनावश्‍यक किंमत वाढीला संघटितरीत्या कसे तोंड देतात, किमती कशा पद्धतीने खाली आणतात, याचा उल्लेख केला आहे. आपण जर पंधरा दिवस कांदा वापरणे बंद केले तर आपोआप कांद्याच्या किमती खाली येतील, असा तर्क यात मांडण्यात आला आहे.

अभिजित परांजपे (आयडियल कॉलनी) - ग्राहकाने जर चातुर्मासाप्रमाणे व्रत करत एक महिनाभर कांदा खाल्ला नाही तर ज्यांनी साठवणूक केली आहे. त्यांना तो विक्रीसाठी बाहेर काढावा लागेल. सध्याच्या किंमतवाढीचा फायदा शेतकऱ्याला नाही; पण साठवणूक करणाऱ्यालाच होत असल्याचे दिसते. दलाल/ व्यापारी तुपाशी आणि शेतकरी, ग्राहक उपाशी असे दिसते. त्यामुळे जनतेने अशी काही भूमिका घ्यायला हवी.

लक्ष्मण चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते) - पेट्रोलच्या किमती वाढल्यातर लोक आंदोलन करत नाहीत; पण कांद्याचे दर वाढले तर लोक नाक मुरडू लागले आहेत. एखाद्या हंगामात शेतकऱ्याला दर जास्त मिळाला तर एवढे काय नुकसान होणार आहे. 
सीताराम बाजारे (शेतकरी कार्यकर्ते) ः काय खावे, खाऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. शेतकऱ्यांची जिरवा, हा सुप्त विचार यामागे आहे. पंधरा दिवस शेतकऱ्यांनी कोणताही माल पाठवायचा नाही, असा निर्णय घेतला तर काय होईल, याचा विचार करावा.

रवी कंद (शेतकरी) - आम्ही शेतकरी आषाढ- श्रावणातच कांदा विकून टाकतो. अवघे दोन-तीन टक्के कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवू शकतात. बाजारात जास्त किमतीने विकला जात असलेला कांदा हा शेतकऱ्याने साठवलेला नाही. याचा फायदा हा व्यापारी दलालांनाच आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com