बारावीच्या ऑनलाईन गुण पडताळणी एक महिना होत आला, तरीही अद्याप अपूर्णच

Exam
Exam

पुणे - बारावीचा निकाल लागला आणि त्यात विज्ञान शाखेत असणाऱ्या करण याला (नाव बदललेले आहे) ७० टक्के मिळाले, परंतु आपल्याला किमान ७५ टक्के गुण असतील, अशी खात्री असल्यामुळे त्याने निकाल जाहीर झाल्यानंतर गुण पडताळणीसाठी अर्ज केला. परंतु हा अर्ज करून आता एक महिना होत आला, तरीही ऑनलाईन गुणपडताळणीची प्रक्रिया 'जैसे थे'च आहे. परिणामी एक-एक गुणांची स्पर्धा असलेल्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत करण व त्याच्यासारख्या असंख्य विद्यार्थी वर्गासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा ऑनलाईन निकाल १६ जुलैला जाहीर केला. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसांपासून अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे  "http://verification.mh-hsc.ac.in" या संकेतस्थळावरुन स्वतः विद्यार्थी किंवा शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय राज्य मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी अर्जही केले. मात्र अर्ज करूनही विभागीय मंडळातर्फे अद्याप कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने करण या विद्यार्थ्याप्रमाणेच अनेकांना प्रवेश प्रकियेत प्रतीक्षा करावी लागत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारावीचा निकाल लागल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापासून ऑनलाईन गुण पडताळणी अर्ज करण्यास सुरवात झाली. त्यासाठी लागणारे विहित शुल्क देखील विद्यार्थ्यांनी ऑनलाईनद्वारे  भरले. त्यानंतर आपण केलेल्या ऑनलाइन अर्जाची माहिती दररोज विद्यार्थी तपासात आहेत. मात्र संबंधित संकेतस्थळावर अर्जाची सदयस्थिती पाहिल्यास् त्यावर 'इन प्रोसेस' असा संदेश दिसत आहे. त्यापुढे अर्ज कोणत्या टप्प्यात आहे, याचे तपशील दिसत नाही. त्यामुळे प्रथम वर्षाचा प्रवेश घेताना विद्यार्थी अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

याबाबत राज्य मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाच्या सचिव प्रिया शिंदे म्हणाल्या,"यंदा पहिल्यांदा ऑनलाइन गुणपडताळणी होत आहे. यासाठी पुणे विभागातून दोन हजार ५३३ अर्ज आले आहेत. परंतु यंदाची ऑनलाईन प्रकिया कार्यन्वित होताना सुरुवातीला तांत्रिक अडचणी येत होत्या. आता तांत्रिक अडचणी पूर्णपणे दुरुस्त करण्यात आल्या आहेत. आता ही कामे येत्या आठवडाभरात पूर्ण करण्यात येतील."

'राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाचा अधिक माहितीसाठी देण्यात आलेला हेल्पलाइन नंबर (दुरध्वनी क्रमांक) दुरुस्ती कामामुळे बंद होता. लवकरच हा संपर्क क्रमांक सुरु होत आहे. तसेच ऑनलाईन गुणपडताळणीतील तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे गुणपडताळणीच्या कामाला गती मिळत आहे."
- प्रिया शिंदे, विभागीय सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे विभागीय मंडळ)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com