esakal | बीएस्सी तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला मात्र ३० टक्के कात्री
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

बीएस्सी तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला मात्र ३० टक्के कात्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे (Corona) ऑनलाइन शिक्षणात (Online Education) अडथळे आले असले, तरीही महाविद्यालयांना अभ्यासक्रम (Syllabus) पूर्ण करण्यात यश आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Pune University) घेतलेल्या आढाव्यात केवळ विज्ञान शाखेच्या (बीएस्सी) (BSc) तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नाही, त्यामुळे द्वितीय सत्र परीक्षेच्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे. वाणिज्य व व्यवस्थापन, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचा पूर्ण अभ्यासक्रम शिकवून झाल्याने त्यामध्ये कपात होणार नाही. तर मानव्य विद्याशाखेबाबत दोन दिवसांत निर्णय होणार आहे. (Only 30 Percent Cut for BSc Third Year Syllabus)

जून महिन्यात विद्यापीठातर्फे द्वितीय सत्र परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे का नाही, याचा आढावा घेण्यासाठी नुकतीच कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली. त्यानंतर विद्याशाखेच्या स्तरावर यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतंर्गत येणारा सर्व अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे. केवळ बीएस्सीच्या तृतीय वर्षातील शेवटच्या सत्राचा अभ्यासक्रम जूनपर्यंत शिकवून पूर्ण होऊ शकणार नाही. तसेच त्यांची प्रॅक्टिकलची परीक्षाही घ्यायच्या आहेत. त्यामुळे ७० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे.

हेही वाचा: पुण्यातील इंजिनिअरचं हटके 'टूल'; PPE किट ठेवणार 'कूल'

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचा अभ्यासक्रम पूर्ण शिकवला गेला असल्याने १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे. मानवविज्ञान विद्याशाखेच्या अभ्यासक्रमांचा निर्णय दोन दिवसांत होईल, असे अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे यांनी सांगितले.

बीएड, शारीरिक शिक्षण यासह इतर अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी १०० टक्के सिलॅबस असणार आहे.

- डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा

बीकॉम, एमकॉम, एमबीएचा ९० टक्के अभ्यासक्रम शिकवून झाला आहे. परीक्षेपूर्वी सर्व अभ्यासक्रम शिकवून होईल. या अभ्यासक्रमांना प्रॅक्टिकल नसल्याने अभ्यासक्रम कपातीची गरज पडणार नाही.

- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन

हेही वाचा: बारामतीतील कोरोना स्थितीबाबत मोठी बातमी

बीएस्सी तृतीय वर्षाची परीक्षा ७० टक्के अभ्यासक्रमाची होणार आहे. इतर अभियांत्रिकीसह सर्व अभ्यासक्रमांसाठी १०० टक्के सिलॅबस असेल. विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रॅक्टिकल परीक्षा घेऊन २५ जूनपर्यंत अंतर्गत मूल्यांकनाचे गुण सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा