Unlock 4.0 : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला 'एवढ्याच' नागरिकांची पसंती; सर्व्हे काय सांगतो पाहा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

देशात एक सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरू होण्याची चिन्हे असून या टप्प्यात सरकारकडून अनेक गोष्टी सुरू करण्याला परवानगी दिली जाऊ शकते.

पुणे : देशात अनलॉकच्या चौथा टप्प्यात लोकल ट्रेन, मेट्रो यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरू झाल्यास केवळ ३६ टक्के नागरिकांनी या सुविधेचा वापर करण्याला सहमती दर्शवली आहे. तर तब्बल ५१ टक्के नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला नकार देणार असल्याचे म्हटले असून १३ टक्के नागरिक काही सांगता येत नसल्याचे सांगत आहेत.

Video : पुण्यातील मानाचे गणपतीही आता फेसबुक, इन्स्टाग्रामवर; भक्तांना मिळाणार लाईव्ह दर्शन

कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी, आता संपूर्ण देशातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल केला जात आहे. देशात एक सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरू होण्याची चिन्हे असून या टप्प्यात सरकारकडून अनेक गोष्टी सुरू करण्याला परवानगी दिली जाऊ शकते. यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून आवश्यक नियम आणि अटींसह काही गोष्टी पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

यात शाळा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (मेट्रो, लोकल ट्रेन) याबरोबरच मल्टीप्लेक्स, चित्रपटगृह, मॉल सुरू करण्याला परवानगी दिली जाऊ शकते. त्यामुळे 'अनलॉक ४.०'च्या टप्प्याबाबत नागरिकांची मते लोकल सर्कल्स या संस्थेने एका सर्वेक्षणानुसार जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये देशभरातील जवळपास २५ हजार नागरिकांनी आपली मते नोंदविली आहेत.

बिनशर्त माफी मागण्यास प्रशांत भूषण यांचा नकार; 'मी माफी मागितली तर...'​

मुंबईतील आयटी कंपनीमध्ये अभियंता असणारे प्रसाद पवार म्हणाले, "मी एरवी कामाला जाण्यासाठी मेट्रोचा वापर करतो. परंतु अनलॉक ४.० मध्ये काही नियम आणि अटींसह मेट्रो सुरू झाली, तरी आरोग्यविषयक सुरक्षिततेचा विचार करता मी माझ्या स्वत:च्या गाडीने जाण्याला प्राधान्य देईल." तर पिंपरी-चिंचवडहून लोकलने पुणे स्टेशनला कामाला येणारे मुकेश जाधव म्हणाले, "सकाळी कामावर वेळेत पोचण्यासाठी लोकल सोईस्कर आहे. त्यामुळे लोकल सुरू झाली, तर मी त्याने प्रवास करण्याचा विचार करेल. (अर्थात स्वतःची पूर्ण काळजी घेईल)  सुरुवातीला काही दिवस प्रवास करून पाहीन, मग त्यानुसार पुढील निर्णय घेईल."

धक्कादायक! खासगी केंद्रातून रेशनकार्ड मिळाल्याने राज्यात खळबळ

सरकारने एक सप्टेंबरपासून सार्वजनिक वाहतूक खुली केली, तर तुम्ही त्याचा पुढील दोन महिने वापर कराल का?
- होय : ३६ टक्के
- नाही : ५१ टक्के
- सांगता येत नाही : १३ टक्के

एक सप्टेंबरपासून सरकारने शाळा सुरू करण्याला परवानगी दिल्यास तुम्ही मुलांना शाळेत पाठवाल का?
- होय : २३ टक्के
- नाही : ६२ टक्के
- सांगता येत नाही : १५ टक्के

मल्टीप्लेक्स, चित्रपटगृहे खुली झाल्यास पुढील दोन महिने तुम्ही त्या ठिकाणी जाणार का?

उत्तर जुलै ऑगस्ट
होय (खूप वेळा जाऊ) ३ टक्के ३ टक्के
होय (किमान एकदा किंवा दोनदा जाऊ) ३ टक्के ३ टक्के
नाही जाणार ७२ टक्के ७७ टक्के
सांगता येत नाही ४ टक्के ३ टक्के
चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत नाही १८ टक्के १४ टक्के

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 36 percent citizens agree to use public transport in Unlock 4