केशरी कार्डधारकांना गहू, तांदूळ कधी? 

अनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रेशन दुकानदांरानी केशरी कार्डधारकांच्या धान्यासाठी जूनमध्ये पैसे भरले आहेत. परंतु जुलै, ऑगस्ट महिन्याचे धान्य अद्याप मिळाले नाही.

पुणे -""केशरी कार्डावर मे आणि जून महिन्याचा गहू, तांदूळ मिळाला. त्यानंतर सप्टेंबर महिना अर्धा गेला. तरी जुलै, ऑगस्ट महिन्यातील धान्याचा पत्ता नाही. रेशन दुकानात चौकशी केल्यास "धान्य वरून आले की कळवू,' असे उत्तर मिळते. सामान्य माणसानं जगायचं कसं? '' कृष्णानगर, मोहम्मदवाडी येथील रहिवासी आणि गृहनिर्माण सोसायटीमध्ये व्यवस्थापक असलेले आकाश भांबुरे सांगत होते. तर, दुसरीकडे रेशन दुकानदारांनी धान्यासाठी सरकारकडे भरलेले पैसे परत घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे केशरी कार्डधारकांना या दोन महिन्यांचे धान्य मिळणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सरकारने केशरी कार्डधारकांना रेशन दुकानांमध्ये गहू आठ रुपये किलो आणि तांदूळ 12 रुपये किलो दराने देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मे आणि जून महिन्याचे धान्य उपलब्ध झाले. प्रतिव्यक्‍ती तीन किलो गहू आणि पाच किलो तांदूळ मिळाला. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धान्य मिळाले नाही. अनेक केशरी कार्डधारक रेशन दुकानांच्या चकरा मारून धान्य कधी येणार, असा प्रश्‍न विचारत आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुमारे आठ कोटी रुपये अडकले 
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रेशन दुकानदांरानी केशरी कार्डधारकांच्या धान्यासाठी जूनमध्ये पैसे भरले आहेत. परंतु जुलै, ऑगस्ट महिन्याचे धान्य अद्याप मिळाले नाही. धान्य मिळण्याची शाश्‍वतीही कमीच दिसतेय. ज्यांनी रोख रक्‍कम भरली होती, त्यांच्यापैकी काही दुकानदारांनी पैसे परत घेतले. शेवटी बॅंकेचे व्याज किती दिवस भरणार? रेशन दुकानदारांचे सुमारे आठ कोटी रुपये अडकले आहेत. आम्ही धान्य वाटपात चुकलो की आमच्यावर कारवाई होते. आता धान्य मिळत नाही. याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न रेशन दुकानदारांनी "सकाळ'कडे उपस्थित केला. या संदर्भात शहराच्या अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आठ दिवसांत हरभरा डाळ येणार 
जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये येत्या 20 सप्टेंबरपासून अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कुटुंबासाठी हरभरा डाळ उपलब्ध होणार आहे. प्रति कार्डधारकास एक किलो हरभरा डाळ मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी केशरी कार्डधारकांच्या धान्यासाठी पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे पैसे परत घेण्याचा प्रश्‍नच नाही. केशरी कार्डधारकांसाठी धान्य का आले नाही, याबाबत काही सांगू शकत नाही. 
- भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील- 
केशरी शिधापत्रिका संख्या- 7 लाख 24 हजार 295 
लाभार्थी - 30 लाख 27 हजार 167 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: orange card holders get two months of grain