आजी-माजी सहाय्यक पोलिस आयुक्‍तांच्या चौकशीचे आदेश

संदीप घिसे 
शनिवार, 30 जून 2018

पिंपरी (पुणे) : नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खून प्रकरणी पिंपरी पोलिसांनी बाबू शेट्टी यांना अटक केली होती. पोलिस तपासात त्यांचा सहभाग न आढळल्याने 60 दिवसांनी त्यांची सुटका केली. गुन्ह्यात सहभाग नसलेल्या व्यक्‍तीला नाहक गोवल्याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्‍तांनी माजी सहायक आयुक्‍त मोहन विधाते आणि विद्यमान सहायक आयुक्‍त सैफन मुजावर यांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याचे ऍड. नीलेश कदम यांनी सांगितले. 

यावेळी बाबू शेट्टी, अनिल आसवानी, सुनील काटे उपस्थित होते. ऍड. नीलेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश टेकवडे यांचा खून 3 सप्टेंबर 2015 रोजी झाला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अडीच महिन्यानंतर बाबू शेट्टी यांना 17 नोव्हेंबरला अटक केली. या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, यासाठी शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यामुळे हा तपास संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाकडे सुपूर्द केला. 14 जानेवारी 2016 शेट्टी यांचा खुनात सहभाग नसल्याने सुटका केली. मात्र आपल्याला 60 दिवस नाहक तुरुंगात राहावे लागले त्याची नुकसान भरपाई द्यावी. गुन्ह्यात अडकविण्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी शेट्टी यांनी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

याबाबत 20 जून 2018 रोजी उच्च न्यायालयाने पोलिस आयुक्‍त यांना तत्कालीन सहायक आयुक्‍त मोहन विधाते व पिंपरीचे वरिष्ठ निरीक्षक सैफन मुजावर यांच्या चौकशीचे आदेश देऊन त्याबाबतचा अहवाल 11 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 

बाबू शेट्टी यांना अटक केल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी त्यांच्या वडिलांना दिल्याची नोंद केली आहे. मात्र शेट्टी यांचे वडील 1992 मध्ये वारले आहेत. यामुळे पोलिसांचा खोटेपणा उघड झाला. राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून शेट्टी यांना गुन्ह्यात गोवल्याचे ऍड. नीलेश कदम यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: order to inquiry of former and current assistant commissioner of police