
लोणी काळभोर (पुणे) : टिव्हीवर काही वर्षांपूर्वी गाजलेल्या शक्तीमान या मालिकेचा सुपर हिरो एकाचवेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन वेगवेगळी काम करत असल्याचे दृष्य आपण सर्वांनीच पाहिले होते. त्याला आपण टाळ्याही वाजवल्या होत्या. या मालिकेतील सुपर हीरोप्रमाणेच हवेली तालुक्यातील प्राथमिक शिक्षकही एकाचवेळी तीन वेगवेगळी कामे तीही वेगवेगळ्या ठिकाणी करताना प्रत्यक्षात दिसणार आहेत. दचकलात ना...दचकू नका..कारण, ही बाब सिरीयलमध्ये नव्हे, तर हवेली तालुक्यात या पुढील काळात प्रत्यक्षात घडणार आहे.
हवेली पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय व शिक्षक विभाग या तीन कार्यालयामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे वरील किमया घडली आहे. वरील तीनही कार्यालयांनी आदेश काढुन एकाचवेळी काही शिक्षकांना तीन वेगवेगळ्या गावातील तीन वेगवेगळ्या कामावर हजर राहण्याचे लेखी आदेश काढले आहेत. त्यामुळे तीसहून अधिक शिक्षकांना कोविड प्रतिबंधासाठी गाव सर्वेक्षण, रेशन धान्य वाटप व कोविड सेंटरमध्ये मदतनीस, अशी तीन वेगवेगळी कामे एकाचवेळी तीन ठिकाणी करावी लागणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून सरकारने कठोर उपाय योजना सुरू केल्या आहेत. या अंतर्गत सध्या कोविड प्रतिबंधासाठी गाव सर्वेक्षण, रेशन धान्य वाटप व कोविड सेंटरमध्ये मदतनीस, रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहन तपासणी, अशी विविध कामे प्राथमिक शिक्षकांना मागिल काही दिवसांपासून करावी लागत आहेत. या कामात सहभागी होण्याबाबत तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या सहीने हवेली तालुक्यातील शिक्षकांना आदेश मिळाले आहेत. मात्र, काही शिक्षकांना वरील तीनही कार्यालयाचे वेगवेगळे आदेश मिळाले असून, त्यांना एकाचवेळी तीन ठिकाणी हजर राहून काम करण्याबाबतच्या सुचना दिल्या गेल्या आहेत.
याबाबत हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश कुंजीर म्हणाले की, तीन वेगवेगळ्या कार्यालयामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे काही शिक्षकांना एकाच वेळी दोन ते तीन ठिकाणी काम करण्याचे आदेश दिले गेले आहेत. तीन वेगवेगळे आदेश मिळाल्याने शिक्षकही नेमके काम कुठे कुठे करायचे, या द्विधा मनस्थितीत अडकले आहेत. एकाच वेळी एकापेक्षा जास्त आदेश आल्याने शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. एकावेळी एकच आदेश द्यावा, अशी मागणी हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी स्वरुपात केली आहे.
सुधारीत आदेश काढणार- तहसीलदार
याबाबत हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी म्हणाले की, काही प्राथमिक शिक्षकांना एकाच वेळी दोन ते तीन ठिकाणी काम करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समजली आहे. वरील बाब गंभीर असून, याची दखल घेण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गरजेप्रमाणे पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येते. या पुढील आदेश देताना वरीलप्रमाणे पुन्हा चुका होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.