Pune News : काँक्रिटीकरणातील उंड्रीमध्ये करडई, हरभरा, कांदा सेंद्रीय शेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Organic farming of sorghum onion Undri pune agriculture

Pune News : काँक्रिटीकरणातील उंड्रीमध्ये करडई, हरभरा, कांदा सेंद्रीय शेती

उंड्री : तंत्र आणि यंत्राच्या सहाय्याने सेंद्रीय शेतीतून चांगले उत्पादन मिळत आहे. एकरावर नव्हे, तर गुंठ्यामध्ये सेंद्रीय पद्धतीने करडई, शेवगा, हरभरा, कांदा अशी पिके घेण्यात समाधान वाटत असल्याचे उंड्री (ता. हवेली) येथील शेतकरी ईश्वर कड यांनी सांगितले.

उपनगरालगत हिरव्यागार शेतीमध्ये काँक्रिटच्या जंगलाने शिरकाव केला आहे. शेतमजूर मिळत नाही, बदलते हवामान आणि बाजारातील चढ-उतार यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करीत तंत्र आणि यंत्राचा समन्वय साधला तर सेंद्रीय शेती फायदेशीर ठरत आहे.

पिकाला उतार चांगला मिळतो. करडई, हरभरा, वांगी, शेवगा अशी पिके घेत असून, शेतीला लेंडीखताचा वापर केला जात आहे, असे येथील शेतकरी उत्तम फुलावरे, गणेश पुणेकर, राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले.

कृषी अधिकारी वर्षा पवार म्हणाल्या की, आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांचा जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीचा पर्याय पुढे येत आहे.

विशेषतः यूरोप व संयुक्त राष्ट्रसंघातील देश हे सेंद्रिय शेतीविषयी अधिक जागरूक असल्याचे दिसून येते. कारण तेथील शेतकऱ्यांची, ग्राहकांची व सरकारी राज्यकर्त्यांची सेंद्रिय शेतीविषयी असलेली मानसिकता आदर्शवत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, तेजग्रुप चे सीएमडी सुभाष शिंगटे म्हणाले की, पर्यावरण व आर्थिक अशा दुहेरी हेतूने सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. हे लक्षात घेता सेंद्रिय शेतीचे संशोधन, प्रशिक्षण, प्रमाणीकरण, शेतमालाचे मूल्यवर्धन, विकास या बाबींना प्राधान्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक असल्याने सध्याच्या युगात सेंद्रिय शेती करणे नितांत गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.