कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

पिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यास महापालिकेला काही प्रमाणात यश आले आहे. शहरातील संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीसाठी मोशी डेपोतील यंत्रणेची क्षमता वाढविण्याची गरज आहे. 

पिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यास महापालिकेला काही प्रमाणात यश आले आहे. शहरातील संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीसाठी मोशी डेपोतील यंत्रणेची क्षमता वाढविण्याची गरज आहे. 

शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे महापालिकेतर्फे दररोज संकलन केले जाते. मोशी कचरा डेपोत वर्गवारी करून प्रक्रिया केली जाते. त्यासाठी कार्बो किंवा बायोक्‍लिन रसायन पाण्यात मिसळून कचऱ्यावर टाकले जाते. त्यामुळे कचरा लवकर कुजून त्याची दुर्गंधीही कमी होण्यास मदत होत आहे. कुजविलेल्या कचऱ्याचे पुन्हा वर्गीकरण करून प्लॅस्टिक, शहाळे, बाटल्या, काच, लोखंड वा तत्सम धातू वेगवेगळे केले जातात. त्यावर स्वतंत्रपणे प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्माण केले जाते. ही सर्व कामे महापालिका बीव्हीजी कंपनीमार्फत करून घेत आहे. 

अशी होते प्रक्रिया 
कचऱ्याचे घंटागाड्यांद्वारे संकलन करून नेहरूनगर व मोशी डेपोत वजन केले जाते. त्यानंतर कचरा कुजविण्यासाठी यार्डात नेला जातो. त्या ठिकाणी एक टन कचरा कुजविण्यासाठी एक हजार लिटर पाण्यात एक लिटर कार्बो किंवा बायोक्‍लिन टाकून फवारणी केली जाते. सात दिवस कचरा कुजवला जातो. त्यानंतर यंत्राद्वारे त्यावर प्रक्रिया केली जाते. बेल्टद्वारे कचरा पुढे-पुढे सरकून अगोदर 75 मिलिमीटर जाळीतून गाळला जातो. 75 मिलिमीटरपेक्षा कमी जाळीचा कचरा 40 मिलिमीटर, 16 मिलिमीटर व चार मिलिमीटर जाळीतून गाळला जातो. त्यामुळे सेंद्रिय खत चार मिलिमीटर जाळीचे मिळते. दरम्यान, शहाळे, प्लॅस्टिक, काच, धातू वेगवेगळे केले जातात. प्लॅस्टिक कचरा इंधन निर्मितीसाठी पाठविला जातो. शहाळांपासून कोकोपीठ व काथ्या काढला जातो. भाजीपाला वेस्टपासून गांडूळ खत निर्माण केले जाते. 

महापालिकेतर्फे कचऱ्यापासून सेंद्रिय खत, गांडिूळ खत व प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती असे प्रकल्प मोशी कचरा डेपोच्या आवारात कार्यान्वित आहेत. कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) व बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहेत. सांगवी येथे ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीचा लघू प्रकल्प उभारला आहे. 
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

Web Title: Organic manure from waste