Coronavirus : काेरोनाच्या लढाईत संस्था, संघटनांकडून माणुसकीचे दर्शन

बावधन : शिधावाटप करताना (डावीकडून) नगरसेवक दिलीप वेडे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ,  भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक.
बावधन : शिधावाटप करताना (डावीकडून) नगरसेवक दिलीप वेडे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक.

धायरी - नऱ्हे येथील शेतकरी शिक्षण मंडळाच्या भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविण्याचा उपक्रम सुरू केला असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त ऋषीराज सावंत आणि प्राचार्य डॉ. गणेश हिंगे यांनी दिली. संस्थेच्या मूडल सॉफ्टवेअर आणि झूम मिटिंग ॲप्लिकेशनद्वारे सर्व विषयांचे ऑनलाइन लेक्चर प्राध्यापक घेत आहेत. 

वडकीत रक्तदान शिबिर
उरुळी देवाची -
 राज्यातील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा मर्यादित शिल्लक राहिल्याने सामाजिक बांधिलकी जपत   शिवसेना हवेली तालुका प्रमुख संदिप मोडक व सहकारी मित्र परिवारांच्या वतीने आणि अक्षय ब्लड बॅंक यांच्या विशेष सहकार्यातून वडकीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण ९१ पिशव्या रक्त संकलित केले. 

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 
पुणे -
 महात्मा फुले पेठेतील मर्कजी बैतुलमाल फाउंडेशन आणि मक्का मजिस्द ट्रस्टने समाजातील एक हजारहून गरजू व्यक्तींना एक महिना पुरेल एवढे धान्याचे वाटप सुरू केले आहे. ट्रस्टचे प्रमुख खलील मुजाहीद, रफीक मणीयार, मतीन मोमीन, खडक उत्तम चक्रे, अजित दरेकर उपस्थित होते.

काळभैरवनाथ देवस्थानची मदत 
धायरी -
 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला धायरी येथील शिवकालीन श्री काळभैरवनाथ देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने एक लाख अकरा हजार रुपयांची मदत करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांच्याकडे देवस्थानचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी धनादेश सुपूर्त केला. 

नाभिक समाजाला मदतीची मागणी
सिंहगड रस्ता -
 सलून व्यावसायिकांचा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी केली आहे. 

महंमदवाडी परिसरात अन्नदान
हडपसर -
 अखिल भारतीय जाणीव संघटना व जनजागृती महिला प्रतिष्ठान यांच्याकडून महंमदवाडी  येथील तरवडे वस्ती परिसरातील गरजू १५० मजुरांना दररोज दोन वेळेचे जेवण तयार करून वाटप करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या वत्सला घुले, लीलाताई दाभाडे, जयश्री घुले, रंजना इंगळे आदींनी पुढाकार घेतला.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना औषधे
मांजरी -
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण टपाल कार्यालयाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना घरपोच औषधे पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गरजूंनी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी किंवा ७०२८००७२४९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक बी. पी. एरंडे यांनी केले आहे.

शंभू महादेव ट्रस्टतर्फे सातशे जणांना धान्यवाटप 
कोंढवा -
 शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट व समस्त गावकरी कोंढवा बुद्रुक यांच्या वतीने कोंढवा बुद्रुक भागातील  सातशे गरजवंतांना  अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 
लॉकडाउनमुळे मोलमजुरी करणाऱ्यांची उपासमार होवू लागल्याने ट्रस्टच्या माध्यमातून पाच किलो गहू, तीन किलो तांदूळ, साखर, तेल, हरभरा आदींसह जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष जालिंदर कामठे, साहेबराव धांडेकर, सदाशिव कामठे, शिवाजीराव मरळ, मधुकरराव धांडेकर, बजरंग वाघ, सुखदेव लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत ट्रस्टने हा उपक्रम राबविला असून, शासनाला सहकार्य करत प्रशासनाच्या  सुचनांचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन जालिंदर कामठे यांनी या वेळी केले.

कोथरूडमध्ये गरजूंना शिधावाटप
कोथरूड -
 बावधन, कोथरूड डेपो परिसरात नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी तीन हजार गरजू कुटुंबांना मोफत शिधावाटप केले. उद्घाटनाप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे, दिगंबर परूळेकर, नगरसेविका अल्पना वरपे, किरण दगडेपाटील आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com