
Dicci : ‘डिक्की’तर्फे दिल्लीत राष्ट्रीय युवा उद्योजक परिषदेचे आयोजन
पुणे : दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे (डिक्की) देशभरातील दलित उद्योजक युवक-युवतींसाठी ४ जानेवारी रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने देशातील ३५ वर्षांखालील अनुसूचित जाती-जमातीचे उद्योजक एकच छताखाली एकत्रित येणार आहेत, अशी माहिती परिषदेच्या राष्ट्रीय समन्वयक मैत्रेयी कांबळे यांनी दिली.
ही परिषद नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, १५ जनपथ रोड सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते होणार आहे.
तर, अध्यक्षस्थानी ‘डिक्की’चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे असतील. ‘सद्य:स्थितीमध्ये आमूलाग्र बदलासाठी : एकत्र प्रयत्न करू’ या संकल्पनेवर ही परिषद आयोजित केली आहे. परिषदेत यशस्वी उद्योजक, अर्थतज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
परिषदेस ‘आयएफसीआय’ कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मनोज मित्तल, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल, बिझनेस- २० चे चंद्रजित बॅनर्जी, युवा-२० चे संयोजक अजय कश्यप तसेच ‘डिक्की’चे राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार नारा, उपाध्यक्ष संजीव डांगी, डॉ. राजा नायक तसेच, समारोपप्रसंगी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे हे उपस्थित असतील. या परिषदेत राज्यातील तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘डिक्की’चे प्रदेशाध्यक्ष मुकुंद कमलाकर आणि पुणे विभागाचे अध्यक्ष राजू साळवे यांनी केले आहे.