esakal | Vidhan Sabha 2019 :  भाजपच्या उमेदवारांसह इतर पक्षांचे अर्ज दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 :  भाजपच्या उमेदवारांसह इतर पक्षांचे अर्ज दाखल

रॅली, चारचाकी-दुचाकी वाहनांचा समावेश, कार्यकर्त्यांची गर्दी, ‘...झिंदाबाद’च्या घोषणा आणि पक्षांचे झेंडे, टोप्या आणि चिन्हांचा मुक्त वापर... अशा वातावरणात शहरातील आठही मतदारसंघांतील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

Vidhan Sabha 2019 :  भाजपच्या उमेदवारांसह इतर पक्षांचे अर्ज दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019
पुणे -  रॅली, चारचाकी-दुचाकी वाहनांचा समावेश, कार्यकर्त्यांची गर्दी, ‘...झिंदाबाद’च्या घोषणा आणि पक्षांचे झेंडे, टोप्या आणि चिन्हांचा मुक्त वापर... अशा वातावरणात शहरातील आठही मतदारसंघांतील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. बहुतांश अर्ज दाखल झाले असले, तरी विविध राजकीय पक्षांच्या बंडखोरांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत घालमेल सुरू होती. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपच्या शहराध्यक्षा आणि आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, काँग्रेसकडून शहराध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. याशिवाय आम आदमी पार्टी, बहुजन वंचित आघाडी, एमआयएम आदी विविध घटकपक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आपचे उमेदवार संदीप सोनावणे यांनी पीएमपीच्या बसने येऊन अर्ज दाखल केला. कसबा मतदारसंघासह कोथरूड, वडगाव शेरी येथील उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार गिरीश बापट उपस्थित होते.

उमेदवारांच्या शक्तिप्रदर्शनात कार्यकर्त्यांबरोबरच मतदारसंघातील नागरिकांचे काही गटदेखील होते. भाजपने एकाच दिवशी आठही अर्ज दाखल केल्यामुळे त्यांचे अनेक लोकप्रतिनिधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करून संबंधित उमेदवारांना शुभेच्छा देताना दिसत होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल, शिवसेनेच्या पल्लवी जावळे, भाजपचे कार्यकर्ते डॉ. भरत वैरागे आदींनी उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल करण्यात येईल, असे सांगितले. 

प्रशासनाकडून  ८ ठिकाणी व्यवस्था
अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने आठ ठिकाणी व्यवस्था केली होती. त्या त्या ठिकाणी निवडणूक कार्यालयापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर रॅली थांबविण्यात येत होती. तर, निवडणूक कार्यालयात उमेदवारांसह पाच जणांना बरोबर सोडण्यात येत होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.