Pune : तरुण पिढीपर्यंत साहित्य पोचविण्यात आमची पिढी अपयशी ठरली : जावेद अख्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

तरुण पिढीपर्यंत साहित्य पोचविण्यात आमची पिढी अपयशी ठरली : जावेद अख्तर

पुणे : ‘‘पूर्वीच्याकाळी आपल्या आजूबाजूला भरपूर साहित्य, कविता, लोककला होत्या. माझे वडील, काका हे लेखक होते. त्यांनी माझ्या पिढीला साहित्याची परंपरा सुपूर्द केली. परंतु आता दुर्दैवाने हा महान वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यात माझी पिढी अपयशी ठरली. तरुण पिढीला आपल्या परंपरा, लोककला, कविता, भाषा याबद्दल अत्यल्प ज्ञान आहे. त्यांच्याकडील शब्दसंग्रह अगदीच तोकडा आहे. त्यांच्यापर्यंत साहित्य पोचवले गेले नाही आणि याला आम्ही जबाबदार आहोत,’’ असे मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.

सिंबायोसिसतर्फे आयोजित दोन दिवसीय व्हर्च्युअल साहित्य महोत्सवाचे उद्‌घाटन जावेद अख्तर यांच्या प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थितीत झाले. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते. अख्तर म्हणाले,‘‘सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात विचारांची प्रक्रिया स्वकेंद्रित झाली आहे. पण साहित्य ही अशी एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला मानवतेशी जोडते.

आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावण्यास मदत करते. ‘साहित्य वाचन’ हे मुळातच आभासी आहे. त्याचा स्वभाव आभासी आहे. साहित्यातून आपली कल्पनाशक्ती समृद्ध होते. भाषा हे साहित्य वाहून नेणारे वाहन आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाला त्याच्या मातृभाषेपासून तोडत असाल, तर तुम्ही त्याला मुळापासून तोडत आहात, हे लक्षात घ्यायला हवे. आकाशात भरारी घेण्यासाठी आधी मातीत रुजणे महत्त्वाचे आहे. साहित्य हे जीवनाचे मूळ आहे.’’

साहित्य हा अभिव्यक्तीचा खजिना आहे. साहित्य, कविता, कला, लोककला या सर्वांची आपल्याला नितांत आवश्यकता असल्याचेही मत अख्तर यांनी नमूद केले. डॉ. मुजुमदार, डॉ. येरवडेकर, डॉ. गुप्ते यांनी विचार मांडले. ‘सिंबायोसिस स्कूल ऑफ लिबरल आर्टस्’च्या संचालिका डॉ. अनिता पाटणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

loading image
go to top