बंद भुयारी मार्गातील अडथळे करणार दूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू
परवानाधारक हातगाडी, फेरीवाले आणि स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यासाठी निश्‍चित केलेल्या भाड्याबाबत तक्रारी असून त्याचा फेरविचार करण्यात येणार आहे. भाडे किती असावे, याबाबत प्रस्ताव मागविला आहे. त्यावर तोडगा निघाल्यानंतर पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावण्यात येणार असल्याचे सभागृहनेते धीरज घाटे यांनी सांगितले.

रस्ते आणि चौकातील वाहतूक कोंडीची कारणे नव्याने जाणून घेण्यात येत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. पीएमपीचे प्रवासी थांबेही सुरक्षित केले जातील. 
- मुरलीधर मोहोळ, महापौर

पुणे - पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले मात्र सध्या विविध कारणांनी बंद असलेल्या भुयारी  मार्गांमधील अडथळे दूर केले जाणार आहे. या मार्गांत पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पदपथांवरील अतिक्रमणे काढून पादचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची सुरक्षितता आदींबाबत महापालिका, पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांची एकत्रित बैठक झाली. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, ‘आरटीओ’चे अजित शिंदे आदी उपस्थित होते. शहरातील विविध भागांमधील रस्त्यांचे स्वरूप, वाहनांची संख्या, पार्किंग व्यवस्था, पदपथ, अतिक्रमणे आणि त्यावरील उपाययोजनांवर या वेळी चर्चा झाली. पादचाऱ्यांसाठी उभारलेले भुयारी मार्ग सध्या किरकोळ कारणांमुळे बंद आहेत. त्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवरून पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर बंद असलेले भुयारी मार्ग खुल्ले करून पदपथावरील अतिक्रमणे काढण्यासाठी तिन्ही विभागांकडून एकत्रित प्रयत्न करण्याबाबत या वेळी चर्चा झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overcoming obstacles in closed subway