पुणे : ज्ञानोबांच्या ओव्यांची रागांमधून अभिव्यक्ती (व्हिडिओ)

संतोष शाळिग्राम
रविवार, 19 मे 2019

जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत ज्ञानेश्‍वरी' तयार केली आहे. 

पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत ज्ञानेश्‍वरी' तयार केली आहे. 

पुण्यातील "सी-डॅक' संस्थेतील वरिष्ठ संचालक डॉ. दिनेश कात्रे आणि त्यांचा मुलगा परितोष यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्ञानेश्‍वरीमध्ये नवरसांची अनुभूती होते. प्रत्येक ओवीतून त्याचा भावाविष्कार अनुभवता येतो. त्यालाच साजेसे संगीत त्यांनी बांधले आहे. त्यासाठी शास्त्रीय संगीतातील यमन, बिहाग, मल्हार, रागेश्री, हमीर, भिन्न षड्‌ज, ललित अशा विविध रागांचा आधार घेऊन ओव्या संगीतबद्ध केल्या आहेत.रागदारीचा वापर आणि संगीतरचनेतील ठहराव यामुळे त्यातील भावार्थ अधिक प्रभावी होतात. या रचनांमध्ये वेग नाही, तर मनातील कल्लोळ शमविणारी शांतता जाणवते.

या गीत ज्ञानेश्‍वरीबद्दल डॉ. कात्रे सांगतात की, काही वर्षांपूर्वी "सी-डॅक'ने ज्ञानेश्‍वरी मल्टिमीडियाच्या रूपात आणण्याचा उपक्रम हाती घेतला होता. डॉ. विजय भटकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. आळंदीचे किसन महाराज साखरे या कामी आम्हाला सहाय्य करीत होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांनी मला प्रत्येक ओवीवर सांगीतिक काम करण्याची इच्छा निर्माण झाली आणि काम सुरू झाले. प्रत्येक ओवीत एक भाव आहे. तो ज्या रागातून अभिव्यक्त होऊ शकेल, याचा विचार करून काव्याची बांधणी रागांमध्ये केली आहे. कारण हे रागही असंख्य वर्षे जुने आहेत.'' 

ज्ञानेश्‍वरांच्या ओव्यांमध्ये काव्य आणि तत्त्वज्ञानदेखील आहे. समाजाकडून त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पण महाकाव्य लिहूनही त्यात एकदाही त्यांनी दु:खोद्‌गार काढलेले नाहीत. मन, वृक्ष, अहिंसा अशा असंख्य गोष्टींवर त्यांनी ओवीतून दृष्टांत दिलेले आहेत, असेही कात्रे यांनी सांगितले. ओव्यांचा गोडवा अधिक वाढविण्यासाठी पाश्‍चात्य संगीतातील सिंफनीचाही आधार त्यांनी घेतला आहे. 

गीत ज्ञानेश्‍वरीतील फ्युजनबाबत परितोष म्हणतो, ""पाशात्य संगीतामध्ये स्वरत्रयींचा वापर केला जातो. तो आणि भारतीय राग संगीतातील सुरावटी यांचा संयोग आम्ही साधला आहे.'' 

संकेतस्थळावरही संगीतबद्ध ओव्या उपलब्ध

ज्ञानेश्‍वरांच्या दहा हजार ओव्या आहेत. त्यातील तीस ओव्या त्यांनी आतापर्यंत संगीतबद्ध केल्या आहेत. आणखी 70 ओव्या संगीतबद्ध करण्याचा त्यांचा संकल्प आहे. ज्ञानेश्‍वरी अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी फेसबुकवर "गीत ज्ञानेश्‍वरी' हे पेज तयार केले आहे. तसेच www.geetdnyaneshwari.in हे संकेतस्थळही आहे. त्यावर संगीतबद्ध ओव्या सर्वांसाठी खुल्या केल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ovi of Dnyanoba Express by Raag