esakal | बेल्लारी, रायगडमधून पुण्याला ऑक्सिजन; सौरभ राव यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen

बेल्लारी, रायगडमधून पुण्याला ऑक्सिजन; सौरभ राव यांची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - बेल्लारी स्टील (कर्नाटक) आणि रायगड जिल्ह्यातील जेएसडब्ल्यू कंपनीतून पुण्याला सुमारे ११० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर होऊन परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे विभागातील पुण्यासह पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयांना सध्या दररोज चारशे मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यापैकी पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यासाठी ३२० मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. पुणे विभागासाठी लागणाऱ्या ४०० मेट्रिक टनांच्या तुलनेत मंगळवारी २९० मेट्रिक टन, बुधवारी ३१० मेट्रिक टन आणि गुरुवारी ३४० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाला आहे. हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. तरीही सध्या ६० मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी राज्य सरकारने बेल्लारी स्टील ऑक्सिजन उत्पादक कंपनीतून ८० मेट्रिक टन आणि रायगड जिल्ह्यातील जेएसडब्ल्यू कंपनीतून ३० मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. जेएसडब्ल्यू कंपनीतून शुक्रवारपासून ऑक्सिजन उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. ही मागणी ३० टनांवरून ५० टनांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह विभागातील अडचण दूर होणार आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे २४०० सिलेंडरचा प्लांट आहे. या प्लांटमधून सातारा तसेच पुणे जिल्ह्यातील भोर, हवेली आणि बारामती तालुक्याला ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा: पुण्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

ऑक्सिजन वापराचे ऑडिट

जिल्ह्यातील जम्बो कोविड सेंटरसह सर्व रुग्णालयांकडून ऑक्सिजनचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, हे तपासण्यासाठी ऑडिट करण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमार्फत हे ऑडिट करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

विशाखापट्टणमहून नाशिकला ऑक्सिजन

विशाखापट्टणम येथून रेल्वेद्वारे येणारा ऑक्सिजन हा नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे‌. मात्र, यामुळे पुणे जिल्ह्यातील कंपन्यांमधून नाशिककडे पाठविण्यात येणारा काही प्रमाणात ऑक्सिजन पुणे जिल्ह्यासाठी उपलब्ध होऊ शकतो, असे सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

बचतीसाठी उपाययोजना

ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासोबतच उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनचा वापर योग्य प्रकारे व्हावा, यासाठी राज्याच्या टास्क फोर्सने काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार रुग्णांना काही वेळ पोटावर झोपवून उपचार केल्यानंतर त्यांच्या फुप्फुसाची क्षमता वाढते. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर कमी होईल. यासह विविध उपाययोजना केल्यास ऑक्सिजनच काही प्रमाणात बचत होणार असल्याचे सौरभ राव यांनी सांगितले

४०० मेट्रिक टन - पुणे विभागासाठी रोज ऑक्सिजनची गरज

३४० मेट्रिक टन - सध्या होणारा ऑक्सिजन पुरवठा

loading image