esakal | जर्मनीतून ‘एएफएमएस’ करणार ऑक्सिजन प्रकल्प एअरलिफ्ट

बोलून बातमी शोधा

Oxygen Project
जर्मनीतून ‘एएफएमएस’ करणार ऑक्सिजन प्रकल्प एअरलिफ्ट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना सर्वाधिक ऑक्सिजनची गरज असल्याचे नुकतेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अहवालातून स्पष्ट झाले आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे देशभरातील रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे आता लष्करी वैद्यकीय सेवेच्या (एएफएमएस) वतीने २३ मोबाईल ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प थेट जर्मनीतून एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील कोरोनाची सद्य परिस्थिती पाहता संरक्षण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, येत्या आठवड्याभरात हे प्रकल्प भारतात येण्याची शक्यता आहे. तसेच हे प्रकल्प देशभरातील ‘एएफएमएस’ अंतर्गत येणाऱ्या कोविड रुग्णालयांमध्ये बसविण्यात येणार आहेत.

हेही वाचा: पाचवी ते आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आणखी लांबली जाण्याची चिन्हे

आणखी २३८ डॉक्टरांची संख्या वाढणार

वाढत्या रुग्णसंख्येमुळे डॉक्टरांची कमतरता भासू नये यासाठी ‘एएफएमएस’मधील लघू सेवा आयोग (शॉर्ट सर्व्हिस कमिशन) योजने अंतर्गत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्तीला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आणखी २३८ डॉक्टरांची संख्या वाढेल.

मोबाईल ऑक्सिजन प्लांटबाबत

प्रत्येक प्रकल्पात ४० लिटर ऑक्सिजन प्रति मिनीट तयार करण्याची क्षमता

एका तासात दोन हजार ४०० लिटर ऑक्सिजनचे उत्पादन

पोर्टेबल मोबाईल प्रकल्प कोठेही बसविणे शक्य

२४ तासांमध्ये २० ते २५ रुग्णांना ऑक्सिजन पुरविणे शक्य