esakal | पाचवी ते आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आणखी लांबली जाण्याची चिन्हे

बोलून बातमी शोधा

Scholarship

पाचवी ते आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आणखी लांबली जाण्याची चिन्हे

sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा आणखी लांबली जाण्याची चिन्हे आहेत. सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ (सीबीएसई) आणि आयसीएसई अशा मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे देश आणि राज्य पातळीवर होणाऱ्या स्पर्धा परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: पुण्यात रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन काळाबाजारात विक्री करणाऱ्या महिलेसह चौघांना अटक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारीत शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोनामुळे यंदा ही परीक्षा फेब्रुवारीएवजी २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती २३ मे रोजी होईल, असे सांगण्यात आले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण सहा लाख २८ हजार ६३० विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. यामध्ये दोन लाख ४२ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी पाचवीच्या, तर तीन लाख ८६ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी आठवीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यातील ४७ हजार ६१२ शाळांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

कोरोनाची परिस्थिती पाहता शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करावी, अशी मागणीही होत आहे. तर राज्य परीक्षा परिषदेतर्फे नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या लाभाची महत्त्वाची परीक्षा आहे. त्यामुळे ती रद्द करणे योग्य ठरणार नाही. परीक्षेसाठी आणखी एक महिन्यचा कालावधी हाती आहे. मात्र, तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात न असल्यास परीक्षा पुढे ढकलली जाण्याची शक्यता असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: बॅंकेत भरणा करण्यासाठी दिलेली 12 लाखाची रोकड घेऊन कर्मचाऱ्याने ठोकली धूम