विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांची कसरत

विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांची कसरत
Published on

सागर रोकडे : सकाळ वृत्तसेवा
पाबळ, ता. १८ : गतवर्षी झालेला अल्प पाऊस, उन्हाच्या तीव्र झळा, आटलेले पाणवठे, ओढे-नाले तसेच विहिरींनी गाठलेले तळ यामुळे तालुक्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पश्चिम भागातील पाबळ परिसरातील गावांमध्ये व वाड्यावस्त्यांवर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

पाबळ व कान्हूर मेसाई या गावांची तहान शासकीय टँकरवर अवलंबून असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हिवरे व केंदूर या गावांतूनही टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी जलजीवन मिशनसह पाणीपुरवठा योजनांची कामे रखडल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पुढील काळात टंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून टँकरची संख्या वाढवावी, जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करावीत व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दोन गावांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
केंदूर आणि हिवरे या गावांसाठी टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाले असून ते मंजुरीसाठी तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. टँकर मंजुरीसाठी प्रथम ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे, तिथून तहसील आणि शेवटी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव जातो.
--------------------------------
दृष्टिक्षेपात टँकर
सुरू असलेले...... ९
मागील वर्षीचे...... १२
प्रस्तावित ...... ३

दृष्टिक्षेपात पाणीयोजना
• गावठाणांसाठी ग्राम पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू
• थिटेवाडी बंधाऱ्यातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पाणीयोजना बंद
• महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांमार्फत जलजीवन मिशनची कामे निधीअभावी अपूर्ण


पाबळ व कान्हूर मेसाई गावांसाठी पाण्याचे टँकर सुरू करण्याला उपविभागीय अधिकारी यांनी परवानगी दिली असून टँकर सुरू आहेत. केंदूर व हिवरे गावासाठी टँकर सुरू करण्याची मागणी प्राप्त झाली असून ती मंजुरीसाठी तहसीलदार यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविले आहे.
- महेश डोके, गटविकास अधिकारी, शिरूर


दरवर्षी कान्हूर मेसाई व पाबळ परिसरातील १२ गावांना व वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या भागात शेतीसाठी अद्याप कायमस्वरूपी पाण्याची सोय नाही. जलजीवन मिशन योजनेचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. सध्या पिण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू आहेत. त्यामुळे शासनाने या भागाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्षात कृती करणे गरजेचे आहे.
- शहाजी दळवी, सामाजिक कार्यकर्ते


01909

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com