सासवड तालुक्यातील भातलागवडीबाबत महत्वाची बातमी

श्रीकृष्ण नेवसे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

-सासवड-पावसाअभावी भातलागवडी रखडल्या.

-भाताच्या आगारात काळदरी खोऱयात पावसाअभावी लागणी रखडल्या

-कशाबश्या 30 टक्के लागणीही सुकू लागल्या., 70 टक्के भातखाचरे पावसाच्या प्रतिक्षेत रितीच.

सासवड ः पुरंदर तालुक्यातील सर्वाधिक पावसाचा व भातपिकाचा परीसर समजल्या जाणाऱया काळदरी खोऱयात यंदाचे भातपिक पावसाच्या खंडाने धोक्यात आले आहे. जिथे कसेबसे भातखाचरात पाणी साठवून भात रोपांच्या केवळ 30 टक्केच पुर्नलागवडी झाल्या, त्यातील दोन - पाच टक्के पिक तग धरुन असून.. बरेच पिक ढगांकडे डोळे लावून बसले आहे. बाकी 70 टक्के क्षेत्रावरील भातलागणी.. भातखाचरेच कोरडी पडल्याने खोळंबल्या आहेत. 

आणखी वाचा - कोरोना लसीसाठी आदर पुनावाला यांनी घेतली मोठी 'रिस्क'

रोपे टाकलेल्या रोपवाटीकेतच रोपांची वाढ बरीच झाली आहे. नंतर पाऊस झाला, तरी रोपे लागणीचा कालावधी निघून गेल्यावर उपयोग होणार नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. रोपे टाकताना चांगला पाऊस झाला, त्यामुळे रोपे वेळेत पडली. मात्र नेमक्या रोपांच्या पुर्नलागवडीच्या वेळीच पावसात खंड पडला व बहुतांशी भातखाचरे पाण्याशिवाय कोरडी पडली. काळदरी, बहीरावाडी, धनकवडी, दवणेवाडी, बांदलवाडी, मांढर, घेरा पुरंदर या पट्ट्यात भात हे मुख्य पिक असते. त्यामुळे हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे. 

पुरंदर तालुक्यात  पुरंदर किल्ल्याच्या नारायणपूर, नारायणपेठ, पोखर, चिव्हेवाडी भागात थोडी बरी लागवड झाली. किल्ल्यामागील घेऱयात व काळदरी खोरे परीसरात  साधारणतः 350 हेक्टर क्षेत्रापैकी 250 हेक्टर क्षेत्र लागणीअभावी रिकामे आहे. पावसाअभावी सारेच शेतकरी चिंतेत आहेत. हा भाग भात लागवडीत सध्या खुप मागे आहे. मागील वर्षी जादा पावसाने भात पिक नुकसानीत गेले होते, तर यंदा पावसातील उघडपीने पिक धोक्यात आल्याचे काळदरीचे उपसरपंच अंकुश परखंडे, डाॅ. संजय फडतरे यांनी सांगितले. पानवडी, गराडे, चिव्हेवाडी आणि पश्चिम भागात मधल्या वळवाच्या पावसाने थोडा भात लागवडीला दिलासा मिळाला., एवढीच जमेची बाजू आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुरंदर तालुक्यात सधारणतः 1,583 हेक्टर क्षेत्रावर भाताचे पिक असते. यंदा त्यातील 60 टक्के क्षेत्रावर रोपांच्या पुर्नलागवडी पाऊस झालेल्या भागातच होऊ शकल्या आहेत. बाकी 40 टक्के लागण रखडल्याने व लागण होऊनही पिक सुकू लागल्याने सार्‍यांची  चिंता सहाजिकच आहे.- गणेश जगताप, कृषी सहायक, पुरंदर

(Edited by : Sagar Diliprao Shelar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paddy planting stalled in Saswad taluka