पाकिस्तानचा अखेरच्या लढतीत विजय
फ्लोरिडा, ता. १६ : टी-२० विश्वकरंडकात साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाने रविवारी आयर्लंड संघावर कसाबसा विजय मिळवला. पाकिस्तानी संघाने अ गटातील लढतीत आयर्लंडवर तीन विकेट राखून मात केली आणि स्पर्धेचा शेवट गोड केला. शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमीर, इमाद वासीमची प्रभावी गोलंदाजी व बाबर आझम (नाबाद ३२ धावा) याने दबावाखाली केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने हा विजय साकारला. पाकिस्तानचा संघ चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर, तर आयर्लंडचा संघ एक गुणासह तळाला राहिला.
आयर्लंडकडून पाकिस्तानसमोर १०७ धावांचे आव्हान उभे ठाकण्यात आले. मार्क अडेयर, बॅरी मॅकार्थी व कुर्टीस कॅम्फर यांनी अचूक टप्प्यात व खेळपट्टीला साजेशी गोलंदाजी केली. त्यामुळे पाकिस्तानचे सहा फलंदाज ६२ धावांतच पॅव्हेलियनमध्ये परतले. मोहम्मद रिझवान (१७ धावा), सईम अयुब (१७ धावा), फखर जमान (पाच धावा), उस्मान खान (दोन धावा), शादाब खान (०) व इमाद वासीम (चार धावा) यांच्याकडून निराशा झाली. पण बाबर आझम (नाबाद ३२ धावा), अब्बास आफ्रिदी (१७ धावा) व शाहीन शाह आफ्रिदी (नाबाद १३ धावा) यांनी पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
दरम्यान, याआधी आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमीर, हारिस रौफ यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे आयर्लंडचे पहिले पाच फलंदाज एकेरी धावा काढूनच बाद झाले. आयर्लंडची अवस्था सातव्या षटकांत सहा बाद ३२ धावा अशी होती. गॅरेथ डेलनी याने ३१ धावांची, मार्क अडेयर याने १५ धावांची आणि जॉश लिटल याने नाबाद २२ धावांची खेळी केल्यामुळे आयर्लंडला नऊ बाद १०६ धावा करता आल्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने २२ धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इमाद वासीम याने अवघ्या आठ धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. मोहम्मद आमीरने दोन, तर हारिस रौफने एक फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक : आयर्लंड- २० षटकांत नऊ बाद १०६ धावा (गॅरेथ डेलनी ३१, जॉश लिटल नाबाद २२, शाहीन शाह आफ्रिदी ३/२२, इमाद वासीम ३/८) पराभूत वि. पाकिस्तान- १८.५ षटकांत सात बाद १११ धावा (बाबर आझम नाबाद ३२, अब्बास आफ्रिदी १७, बॅरी मॅकार्थी ३/१५).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.