कोल्हापूर: नांदणीत डोहातून पाणी उपसण्याची वेळ

कोल्हापूर: नांदणीत डोहातून पाणी उपसण्याची वेळ
Published on: 

नांदणीत डोहातून पाणी उपसण्याची वेळ

पिके धोक्यात; पंचगंगा काठावरील गावे धास्तावली

ॲग्रोवन वृत्तसेवा
जयसिंगपूर, जि कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने खालावत असल्याने नदीकाठच्या गावांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा वाढत असताना ऊस, भाजीपाला आणि अन्य पिकांना पाण्याची नितांत गरज भासत आहे. मात्र, नदीचे पात्र तळाला गेल्याने तीव्र पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नदीकाठी साचलेल्या डोहातून पाणी उपसा करून पिके जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कमी पावसामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ऊस पिकविला आहे. काही भागांत ऊस तोडणीच्या टप्प्यावर आला असून या काळात पिकाला पुरेसे पाणी मिळणे अत्यावश्यक आहे. मात्र, पंचगंगेतील पाणी पातळी कमी झाल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पाण्याअभावी उसाची वाढ, वजन आणि उत्पादन यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ऊस पिकाबरोबरच भाजीपाला आणि अन्य पिकांनाही वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. वेळेत पाणी मिळाले नाही, तर उत्पादनात घट होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावरही मोठा परिणाम होऊ शकतो. शेतीचा वाढता खर्च आणि नैसर्गिक संकटांशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता पाणी टंचाईचे नवे संकट उभे राहिले आहे.

दरम्यान, पंचगंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. नदीतील पाणीसाठा आणखी कमी झाल्यास गावांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाईचा आढावा घेऊन पर्यायी उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी होत आहे.

दुसरीकडे, ऊसदराच्या आंदोलनामुळे साखर कारखाने नेमके कधी सुरू होणार याबाबतची अनिश्चितता कायम आहे. तोडणीसाठी तयार होत असलेल्या उसाला पाणी देण्याची गरज आणि कारखाने सुरू होण्याबाबतची संदिग्धता अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. पंचगंगेची पाणी पातळी वाढविण्यासाठी आता पावसाची प्रतीओक्षा असून नदीकाठच्या गावांसह शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. दरम्यान पावसावर विसंबून न राहता प्रशासनाने पर्यायी व्यवस्था राबवावी अशीही मागणी होत आहे.

--- फोटो --- B08096 ---
नांदणी, जि. कोल्हापूर : नद्यांचे पाणी कमी झाल्याने नदीकाठच्या डोहातून पिकासाठी पाणी उपसण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com