esakal | एका ‘दगडात’ दोन पक्षी...
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

एका ‘दगडात’ दोन पक्षी...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सु. ल. खुटवड (९८८१०९९०९०)

‘‘मा झ्या अंगावर चिखलाचा एक थेंब जरी उडाला तर तुमच्या गाडीवर हा दगड टाकलाच म्हणून समजा! आधी तुमच्याकडे पाहतो अन् नंतर खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेकडे बघतो,’’ असे म्हणून जनुभाऊंनी हातातील दगड चालकाला दाखवला. एका ज्येष्ठ नागरिकाचे हे रुप पाहून गाडीचालकाने कासव गतीने खड्ड्यातून गाडी नेली आणि जनुभाऊंनी हातातील दगड पिशवीत ठेवला.‍ पुण्यात अनेक ठिकाणी घाण पाणी साचलेले मोठमोठे खड्डे आहेत. त्याच्याजवळून एखादी व्यक्ती जात असेल तर काही गाडीचालक मुद्दाम गाडीचा वेग वाढवून चिखल त्या व्यक्तीच्या अंगावर उडवतात, याचा अनुभव जनुभाऊंनी गटारी अमावस्येच्या दिवशी घेतला होता. एका मोठ्या खड्ड्याशेजारून जनुभाऊ चालले होते. त्यांची टर उडविण्यासाठी चालकाने गाडीचा वेग मुद्दाम वाढवला. त्यामुळे जनुभाऊ चिखलाने अक्षरशः माखले होते. त्यामुळे ते तसेच घरी परतले. सोसायटीच्या गेटवरच कारंडे, सोनवणे व बेल्हेकर हे त्यांचे कट्टर विरोधक भेटले.

‘‘काय जनुभाऊ, आज गटारी अमावस्या जोरात साजरी केली वाटतं. मज्जा आहे बुवा तुमची!’’ कुत्सितपणे हसत कारंडे म्हणाले. त्यावर सोनवणे म्हणाले, ‘‘अहो कारंडे, काही जणांचा स्वभावच असा असतो की, ‘मी नाही त्यातली नाही अन् कडी लावा आतली.’ यावर तिघेही जोरात हसले. त्यावर दात-ओठ खात जनुभाऊ घरी आले. चिखलात लोळून आलेला आपला नवरा बघून कावेरीबाईंनी तर आकाशपाताळ केलं.

‘‘या वयात तुम्हाला दारू पिऊन गटारात लोळावंसं कसं वाटलं? नको ती थेरं करताना जनाची नाही मनाची तरी लाज बाळगायची होती.’’ असं म्हणून कावेरीबाई रडू लागल्या. जनुभाऊंनी कशीबशी त्यांची समजूत काढून घडलेला प्रकार सांगितला. इकडे मघाच्या त्रिकुटाने चिखलाने माखलेल्या कपड्यांसह जनुभाऊंचे फोटो सोसायटीच्या व्हॉटस ग्रुपवर टाकून ‘आपल्या सोसायटीत गटारी अमावस्या उत्साहात साजरी’ अशी फोटोओळ टाकून आगीत तेल ओतलं. तेव्हापासून जनुभाऊ पिशवीत दगड घेऊनच पुण्यात हिंडू लागले. एखादा मोठा खड्डा लागल्यावर चालकाला लांबूनच ते दगड दाखवू लागले. त्यामुळे एकाही वाहनचालकाने त्यांच्या अंगावर चिखल उडवण्याचा प्रयत्न केला नाही. आपली ही आयडिया यशस्वी झाल्याचे पाहून मनोमन ते खूष झाले.

हेही वाचा: टर्निंग पॉइंट : ‘रयत’ने मला घडविले

जनुभाऊंच्या वाड्यासंदर्भातील फाइल महापालिकेतील एका अधिकाऱ्याने दाबून ठेवली होती. सगळी कागदपत्रे देऊनही तो अधिकारी जनुभाऊंना खेटे मारायला लावत होता. त्यामुळे ते वैतागून गेले होते. आजही जनुभाऊ त्या अधिकाऱ्याला भेटले. त्यांनी जनुभाऊंना उडवाउडवीची उत्तरे दिली. फाइल काढून, त्यात काय काय त्रुटी आहेत, हे त्यांनी सांगितले. त्यावर जनुभाऊ म्हणाले, ‘‘माझं काम होणार आहे की नाही हे एकदा फायनल सांगा.’’ त्यावर तो अधिकारी म्हणाला, ‘‘स्पष्ट सांगू का, तुमची फाइल एकदम क्लिअर आहे. पण फाइलमधील कागदपत्रे उडून जाऊ नयेत म्हणून काहीतरी वजन ठेवावं लागेल. तुम्ही वजन ठेवा मी लगेच सही करतो.’’ त्या अधिकाऱ्यानं असं म्हटल्यावर जनुभाऊंनी पिशवीतून भलामोठा दगड काढला व तो फाइलवर ठेवला.

‘‘एवढं वजन पुरेसं आहे का? की अजून ठेवू?’’ जनुभाऊंची कृती व चेहऱ्यावरील हावभाव पाहून अधिकाऱ्याची चांगलीच भंबेरी उडाली. काहीही न बोलता त्यांनी मुकाट्याने फाइलवर सही केली. मग विजयीमुद्रेनं जनुभाऊ महापालिकेतून बाहेर पडले. अनेकजण आता त्यांना ‘दगडवाले जनुभाऊ’ या नावाने ओळखतात.

loading image
go to top