‘पंच’नामा : संचारबंदीतील ‘विरंगुळा’

Panchnama
Panchnama

‘‘आज रात्रीचा तुझा काय प्रोग्रॅम आहे? रात्रीची संचारबंदी बघायला बाहेर पडायचं का? तेवढाच जिवाला विरंगुळा. मस्तपैकी जिवाचं पुणं करू. हाय काय अन् नाय काय.’’ ! प्रशांत दामले यांच्यासारखे हातवारे करीत विराजने सतीशला म्हटले.
‘‘नको रे बाबा ! मागच्या लॉकडाउनमधील ‘आठवणी’ अजून अधून-मधून ठणकतात. पुन्हा तसले ‘वळ’ सोसायची ‘कळ’ आपल्यात नाही बुवा ! दुसरं काही तरी सुचव! ’’ सतीशने विचारले.
‘‘अरे काळजी करू नकोस. आता पोलिस मारत नाहीत. फक्त विचारपूस करतात आणि सोडून देतात. पण संचारबंदीसारखं मनोरंजन दुसऱ्या कशात नाही बघ.

सगळीकडे कसं शांत शांत आणि आपण राजासारखं रस्त्यावर मनोसक्त हिंडायचं, याच्यासारखं सुख नाही बघ.’’ विराजने हसत म्हटले.
‘‘पण पोलिसांनी पकडले तर काय सांगायचे?’’ सतीशने विचारले.
‘‘अरे जवळ तीन पाळ्याचा जेवणाचा डबा ठेवायचा. पोलिसांनी विचारलं तर दवाखान्यात पेशंटला डबा घेऊन चाललोय, असं सांगायचं. हाय काय आणि नाय काय ! ’’

शेवटी दोघांचे फायनल झालं. विराजने गाडी काढली. तीन पाळ्यांचा डबा घेतला. त्यात वेपर्स, फरसाण व भाजलेली मूग डाळ ठेवली. संचारबंदी बघून दमल्यानंतर विसावा म्हणून कुठं तरी ‘बसायचं’ हेही त्यांनी ठरवलं. त्यासाठीची साग्रसंगीत तयारी त्याने केली होती. सांयकाळी सहाला ते घराबाहेर पडले पण बाहेरचे दृश्‍य बघून, दोघेही नाराज झाले. कारण नेहमीप्रमाणेच रस्त्यावर गर्दी होती. ‘‘अरे ही कसली आलीय संचारबंदी. सगळी माणसं तर रस्त्यावरच आहेत. हे बघण्यासाठी आपण बाहेर पडलोय का?’’ सतीशने नाराजी व्यक्त केली.

‘‘अरे थोडा वेळ वाट पाहू या. सब्र का फळ मीठा होता है.’’ असे म्हणत विराजने त्याची समजूत काढली. सातच्या दरम्यान रस्त्यावरील गर्दी कमी होऊ लागली. पोलिसही रस्त्यावर आले होते. त्यामुळे सगळीकडे शांतता होती. मधूनच एखादी रूग्णवाहिकेचा सायरनचा आवाज शांततेला भंग करीत होता. सातच्या सुमारास बाजीराव रस्ता एकदम सुनसान होता. ‘याला म्हणतात संचारबंदी ! आता मस्तपैकी एन्जॉय करू. उड्डाणपुलांवरून फिरू,’’ असे म्हणत विराजने गाडी दामटली. नऊच्या सुमारास डेक्कनला पोलिसांनी या दोघांना अडवले.

‘‘संचारबंदी लागू आहे माहिती नाही का? कुठं हिंडताय.’’ एका पोलिसाने म्हटले.
‘‘साहेब, पेशंटला डबा घेऊन चाललोय. हा बघा.’’ असे म्हणत विराजने डबा दाखवला.
‘‘कोठल्या हॉस्पिटलमध्ये’’? दुसऱ्या पोलिसाने विचारले.
‘‘दिनानाथमध्ये’’ विराजने म्हटले. त्याचवेळी सतीशने ‘सह्याद्री’मध्ये म्हटलं. एकाचवेळी दोघांकडून वेगवेगळी उत्तरे आल्याने पोलिसांचा संशय वाढला. त्यांनी डबा उघडून दाखवण्यास सांगितला. त्यावेळी दोघेही ‘ततपप’ करू लागले. ‘‘डब्यासारखा डबा. त्यात काय बघण्यासारखे? हाय काय अन् नाय काय ! ’’ सतीशने म्हटले.
‘‘कोरोना पेशंटचा डबा असा रस्त्यात उघडल्यावर कोरोना पसरायचा नाही का?’’ विराज म्हणाला.

‘‘कोरोना असा पसरतो का’’? पोलिसाने दोघांना दरडावले. ‘‘मुकाट्याने डबा उघडून दाखव.’’ असा दम दिल्यावर विराजने डबा खोलला. त्यात वेपर्स, फरसाण बघून पोलिसाची चांगलीच सटकली.
‘‘साहेब, पेशंटला उपवास आहे ना. म्हणून त्याच्यासाठी वेफर्स.’’ विराजने बळंबळं सांगितलं.
‘‘असं काय’’? असे म्हणून एका पोलिसाने काठीचा प्रसाद त्याला दिला.
‘‘खरं खरं सांगा, हा काय प्रकार आहे’’? पोलिसाने दोन फटके टाकत विचारले. त्यानंतर संचारबंदीतील विरंगुळ्यासाठी आपण बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले.

‘‘अच्छा ! तुम्हाला विरंगुळा हवाय होय. तो आम्ही तुम्हाला मस्त देऊ,’’ असे म्हणून पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात नेले. तेथील एका अंधाऱ्या कोठडीत मच्छरांच्या सानिध्यात त्यांना सोडले. ‘येथे तुमचा रात्रभर मस्त विरंगुळा होईल. अधून- मधून नाना पाटेकरचा ‘एक मच्छर आदमी को....’ हा डायलॉग एकमेकांना ऐकवत राहा. हाय काय अन् नाय काय !’’

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com