esakal | पंचनामा: उसन्या पैशाला थापांचा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

पंचनामा: उसन्या पैशाला थापांचा आधार

sakal_logo
By
सु. ल. खुटवड-सकाळ वृत्तसेवा

उसने घेतलेले पाच हजार रुपये मागून महेश वैतागून गेला होता पण राहुल काही त्याला दाद देत नव्हता. ‘पाऊस आल्यावर देतो’, ‘पितृ पंधरवडा संपल्यानंतर देतो’, ‘लग्न झाल्यानंतर देतो’, ‘आहेरातून वळते करून घेतो’, ‘कोरोनाचे उच्चाटन झाल्यानंतर देतो’, असे वायदे तो करू लागला आणि एकदा तर त्याने ''पुण्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाल्यावर पैसे देतो’ असे सांगितले. हे ऐकून आपल्याला पैसे देण्याची राहूलची इच्छा नसल्याची महेशला खात्री पटली.

शाळेपासून कॉलेजपर्यंत दोघेही एकत्र शिकत होते. त्यामुळे त्यांची मैत्रीही घट्ट होती. उसन्या घेतलेल्या पैशांवरून त्याला बाधा पोचू नये, अशी महेशची इच्छा होती. काही दिवसांनी आपण महेशकडून पैसे उसने घेतलेत, हेच राहुल विसरुन गेला.

‘‘मी आणि उसने पैसे शक्यच नाही,’’ असेही तो म्हणू लागला. एकेदिवशी महेशने फोन केला.

‘‘राहुल, तुला आपल्या नववीच्या वर्गातील दीप्ती आठवते का रे? तिच्या डाव्या गालावर तीळ होता बघ.’’ मुलींचा विषय काढल्यावर राहुलचा चेहरा उजळला. या विषयावर किती बोलू आणि किती नको, असं त्याला होऊन गेलं.

‘‘महेश, हे काय विचारणं झालं का? ती बॉबकटवाली ना? चांगली आठवते पण तिच्या डाव्या गालावर तीळ नव्हता रे. उजव्या गालावर होता. मला विचारून घे. माझी स्मरणशक्ती अफाट आहे.’’ राहुलने असे म्हटल्यावर महेश म्हणाला,

‘‘पंधरा वर्षापूर्वी आपल्या वर्गात शिकत असलेल्या मुलीच्या डाव्या गालावर तीळ होता का उजव्या गालावर, हे तुला अजूनही लख्ख आठवते आणि माझे उसने पैसे तुला आठवत नाहीत, याला काय म्हणायचे?’’ महेशने असं झापल्यावर राहुल म्हणाला, ‘‘अरे देणारच होतो पण सध्या तंगी असल्याने थोडे लांबले.’’

‘‘राहुल, अनोळख्या मुलींना मोबाईलचा रिचार्ज मारायला तुझ्याकडे पैसा असतो. पण माझे पैसे द्यायची वेळ आल्यावर तंगी असते. मुलींना फुकटचे रिचार्ज मारुन दिल्यानंतर त्या आपल्यावर प्रेम करतील, नंतर लग्न करतील, या भ्रमात तू राहू नकोस.’’ महेशने त्याला सल्ला दिला.

‘‘अरे लग्नाचं वय उलटून चालल्यामुळे मला जाम टेंशन आलंय. कोठल्याही मार्गाने आपलं लग्न जमावं, हीच माझी इच्छा आहे. त्यासाठी दर महिन्याला मी पाच हजार रुपये रिचार्ज मारण्यावर खर्च करतो. त्यापेक्षा तू सुचव ना एखादे चांगले स्थळ.’’ राहुलने काकुळतीला येत म्हटले. त्यानंतर काही दिवसांनी महेशने राहुलला फोन केला पण पैशांची मागणी ऐकून ‘लवकरच देतो’ असे सांगून राहुलने कट केला. परत काही दिवसांनी महेशने फोन केला. मात्र, राहुल फोन काही घेईना. आपण पंधरा-वीस फोन करूनही राहुलने एकदाही तो न घेतल्याने महेश जाम उखडला. मात्र, मैत्रीला जागत त्याने संयम पाळला. राहुल फोन घेत नसल्याने महेशने त्याला एकदा व्हॉटसअपवर मेसेज केला.

‘‘तुला फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या वर्गातील प्रिया आठवते? ती काल मला शनिवारवाड्याजवळ भेटली होती. तिचं अजून लग्न झालं नाही. ती तुझी सारखी आठवण काढत होती. तिने तुझा मोबाईल नंबर मागितला पण तुला विचारल्याशिवाय मी एका परक्या मुलीला तुझा नंबर कसा देणार? तिनं तिचा मोबाईल नंबर मला दिला आहे. तुझा नंबर देऊ का रे?’’ हा मेसेज वाचल्यावर राहुलने लगेचच महेशला फोन केला. पण महेशने तो उचलला नाही. दुसऱ्या मिनिटांत राहुलने आॅनलाइनद्वारे महेशच्या खात्यावर पैसे जमा केले.

‘‘माझा फोन नंबर प्रियाला दे व तिचा मला दे.’’ असे शेकडो मेसेज त्याने महेशला पाठवले.

आज पंधरा दिवस झाले. राहुल दिवसभरात वीस-पंचवीस वेळा महेशला फोन करतो पण महेश त्याकडे दुलर्क्ष करतो.

loading image
go to top