

जयकुमार गोरे यांचे छायाचित्र
कॉरिडॉरनंतर पंढरपुरात विमानतळ उभारण्याचा मानस
पालकमंत्री जयकुमार गोरे; आराखड्यातील कामाला लवकरच सुरू
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २ : लाखो भाविकांच्या सोयीसाठी पंढरपुरात सुमारे चार हजार कोटी रुपये खर्च करून कॉरिडॉरच्या माध्यमातून विठ्ठल मंदिर परिसराचा विकास केला जाणार आहे. आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यानंतर देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विमानतळ उभारण्याचा सरकारचा मानस आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
मंत्री गोरे मंगळवारी (ता. १) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रस्तावित कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळ उभारण्याच्या दृष्टीने सरकारचा विचार सुरू असल्याचे सांगितले.
गोरे म्हणाले, ‘‘विठ्ठल मंदिर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उज्जैन, काशीच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली असून राज्य सरकारने सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. स्थानिक व्यापारी व रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी सरकारने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू होणार आहे. स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची सरकारने खबरदारी घेतली आहे. मात्र, काही लोक विनाकारण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. चार-दोन लोकांच्या विरोधामुळे कॉरिडॉरचे काम थांबणार नाही. कॉरिडॉरमुळे पंढरपूरचा विकास, रोजगारनिर्मिती आणि शहराची आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्यामुळे भविष्यात पंढरपुरात विमानतळ उभारण्याच्या दृष्टीनेही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात होईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.