esakal | कुख्यात पप्पू वाडेकर खून प्रकरणातील आरोपींना मकोका
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

कुख्यात पप्पू वाडेकर खून प्रकरणातील आरोपींना मकोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजगुरूनगर : येथील कुख्यात गुंड राहुल उर्फ पप्पू कल्याण वाडेकर, याच्या खुनातील सात संशयित आरोपींवर आता महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वयेही ( मकोका ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली. मकोका कलम लागल्याने आता या संशयित आरोपींना जामीन मिळणे मुश्कील होणार आहे.

पाबळ रस्त्यावर होलेवाडीजवळ, पप्पू वाडेकर याचा ११ जुलैच्या रात्री दहा जणांच्या टोळीने पिस्तुल, धारदार हत्यारे व दगड-धोंड्याचा वापर करून खून केला होता. या खुनाच्या गुन्ह्यात तौसिफ शेख, मिलिंद जगदाळे, विजय उर्फ बंटी जगदाळे, मयूर जगदाळे, जितेंद्र गोपाळे, प्रवीण उर्फ मारुती थिगळे व पवन थोरात हे सात संशयित आरोपी अटकेत आहेत, तर तीन आरोपी फरार आहेत. अटकेत असलेल्या सातजणांवरील गुन्ह्यात, खुनाच्या कलमाबरोबर मकोकाचे कलमही लावण्यात आले आहे.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी तौसिफ शेख याने संघटीत टोळी तयार करून, टोळीची दहशत निर्माण केली. टोळीप्रमुख तौसिफ याने स्वतः आणि टोळीतील वेगवेगळ्या सदस्यांच्यामार्फत अनेक गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी टोळीची दहशत निर्माण करून, गुन्ह्यांची शृंखला चालू ठेवली. त्यातून ते स्वत:चा आर्थिक फायदा करून घेत चैनीचे जीवन जगत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांच्या या कारवायांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले असून खेड व आंबेगाव तालुक्यांत व परिसरामध्ये त्यांची दहशत निर्माण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

म्हणून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, यांच्या आदेशानुसार खेडचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी या सात आरोपींच्या विरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ चे कलम २३ (१)(अ) प्रमाणे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास लोहिया यांनी मंजुरी दिल्याने सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(i) (ii),३ (४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते करीत आहेत.

loading image
go to top