शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार; सोशल डिस्टन्सिंगबाबत काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार; सोशल डिस्टन्सिंगबाबत काळजी

आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शाळेची घंटा २३ नोव्हेंबरपासून पुन्हा वाजणार आहे. एरवी मुलांना आवर्जून शाळेत पाठविण्यास आग्रही असणारे पालक या वेळी मात्र धास्तावले आहेत.

शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार; सोशल डिस्टन्सिंगबाबत काळजी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जवळपास आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शाळेची घंटा २३ नोव्हेंबरपासून पुन्हा वाजणार आहे. एरवी मुलांना आवर्जून शाळेत पाठविण्यास आग्रही असणारे पालक या वेळी मात्र धास्तावले आहेत. कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला असला, तरी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास पालक नकार दर्शवीत असल्याचे चित्र आहे.

शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पालकांची मते जाणून घेतली असता, ते मुलांना शाळेत पाठविण्यास इच्छुक नसल्याचे निदर्शनास आले. क्रीडापटू आणि स्केटिंग प्रशिक्षक असलेल्या प्रियांका येडलवार म्हणाल्या, ‘‘राज्य सरकारच्या निर्णयानुसार सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालक करून शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थी एकमेकांजवळ येणारच, हे नक्की आहे. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे भान राहणार नाही. एक पालक म्हणून मुलींना शाळेत पाठवणे मला योग्य वाटत नाही.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एका नामांकित कंपनीत ग्राहक सेवा विभागात सहाय्यक व्यवस्थापक असणाऱ्या मेघना जोशी म्हणतात, ‘‘कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला असला, तरी शाळा सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होईल, हे सांगता येणार नाही. त्याशिवाय शाळेत विद्यार्थी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतीलच, हे नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी परिस्थिती आणखी सुरळीत होण्याची प्रतीक्षा करणे आवश्‍यक आहे.’’

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वतः शिक्षिका असलेल्या अनिता मसुरकर म्हणाल्या, ‘‘शाळा सुरू करण्यासाठी सरकारने थोडे दिवस थांबायला हवे, असे वाटते. दिवाळीनंतर कोरोनाची साथ अशीच आटोक्‍यात राहिल्यास एक डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यास हरकत नाही, तोपर्यंत कोरोनाच्या स्थितीचे चित्र अजून स्पष्ट होईल. शिक्षिका म्हणून मी ही विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. पण, त्यांचे आरोग्य सर्वांत महत्त्वाचे आहे.’’

पालकांचे म्हणणे...
शाळेत पूर्णपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार का?
शाळेत पुरेशी स्वच्छता राखणे शक्‍य नाही.
ऑनलाइनपेक्षा प्रत्यक्ष वर्गातून विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक चांगल्याप्रकारे होते.
मुलांना शाळेत जायचे आहे, पण घाईने निर्णय नको

loading image
go to top