Junnar News : संसदेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारला धरले धारेवर

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील ज्वलंत समस्या बनलेल्या बिबट्यांच्या उपद्रवाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
Dr. Amol Kolhe
Dr. Amol Kolhesakal

जुन्नर - 'राष्ट्र केवळ ना इमारतींनी, ना पूल बांधून किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आणि बजेटच्या आकड्यांनी बनत नाही, तर देशवासियांच्या हृदयातील उत्कट देशभक्तींमुळे राष्ट्र बनते' अशा शब्दात केंद्र सरकारची कानउघडणी करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना सरकारला धारेवर धरले.

अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणात उल्लेख झालेल्या भयमुक्त वातावरणासंदर्भांत बोलताना खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील ज्वलंत समस्या बनलेल्या बिबट्यांच्या उपद्रवाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. प्रत्येक देशबांधवाला भयमुक्त वातावरणात जीवन व्यतीत करण्याची इच्छा आहे.

परंतु माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात तशी परिस्थिती नाही. या ठिकाणी दिवसा थ्री फेज वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच्या अंधारात जावे लागते. अशा परिस्थितीत रोज कुठे ना कुठे नागरिकांवर बिबट्याचा हल्ला होत असतो. आजपर्यंत १८ हजार लोकांचं नुकसान झालं आहे, तर २२-२५ लोकांनी आपला जीव गमावला आहे, याकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

नॅशनल वाईल्ड लाईफ सर्व्हेच्या अहवालाचा अभ्यास केला तर शिरुर लोकसभा मतदारसंघात बिबट्यांची संख्या जवळपास ४०० ते ५०० इतकी आहे. त्यामुळे जुन्नर वनविभागाने राज्य सरकारकडे बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव पाठवला आहे. हाच एकमेव पर्याय असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या संदर्भात अभ्यास करुन बिबट प्रजनन नियंत्रण धोरण लागू करावे तसेच शिरुर लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला द्यावेत अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी केली.

पिंपरी-चिंचवड परिसरातील 'रेडझोन'च्या प्रश्नाबाबत आवाज उठवताना डॉ. कोल्हे यांनी केंद्र सरकारच्या धोरणातील विसंगतीवर बोट ठेवले. डॉ.कोल्हे म्हणाले की, राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात गरीबांसाठी घरांचा केलेला उल्लेख निश्चितच स्तुत्य आहे.

परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघात जवळपास दीड-दोन लाख नागरिक असे आहेत की, ते पक्क्या घरात रहात असले तरी अॅम्युनिशन फॅक्टरीच्या रेडझोनमुळे अनधिकृत ठरले आहेत. एकीकडे आपण कायद्यात सुधारणा करण्याच्या गोष्टी करतो पण रेडझोनसाठी आपण १९०३ चा ब्रिटीशकालीन इंडियन डिफेन्स अॅक्टनुसार २ हजार यार्ड मर्यादा आखतो.

पण १९७० सालच्या युनायटेड नेशनच्या स्टोरेज टेक्निकल एक्स्प्लोसिव्ह कमिटीच्या आपण स्वीकारलेल्या कायद्यानुसार २०० ते ५०० मीटर इतकीच रेडझोनची मर्यादा असली पाहिजे याचा विचार करत नाही. १९७० साली स्वीकारलेल्या कायद्यानुसार ५०० मीटर रेडझोनची मर्यादा करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी डॉ.कोल्हे यांनी केली.

केंद्र सरकारचा कथनी आणि करणीतील फरक दाखवताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा व कृषी मालाच्या निर्यातीबाबत उल्लेख केला, पण प्रत्यक्षात सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या धोरणातील विसंगतीवर त्यांनी बोट ठेवले.

कोल्हे म्हणाले, मागील ३५-४० दिवसांपासून कांदा निर्यातीवर बंदी आणल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगत या निर्यात बंदीमुळे पाकिस्तानी शेतकऱ्यांचे भले झाले याकडे लक्ष वेधून पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याच्या बाता करणाऱ्या केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याची टीका केली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेतील फोलपणा उघड करताना खासदार डॉ. कोल्हे यांनी सन २०१३ मध्ये डीएपीची बॅगची किंमत ५६० रुपये होती, तर २०२४ मध्ये या बॅगची किंमत ११०० रुपये झाली तर मजुरीचा दर ५ हजार होता तो आता ११ हजार झाला, असे असताना २०१३ मध्ये कांद्याचा दर होता २० रुपये किलो आणि आज २०२४ मध्ये कांद्याचा दर ८-१० रुपये किलो आहे.

मग शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले की, दुपटीने कमी झाले असा वस्तुनिष्ठ सवाल खासदार डॉ. कोल्हे यांनी केला. आपण विकसित भारताचा एक स्तंभ मानता. पण जशी दिल्लीत थंडी आहे हे सांगावे लागत नाही तर तीचा अनुभव येतो. तसा विकसित भारत आहे हे सांगावे का लागते? त्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना का येत नाही, असा सवालही खासदार डॉ. कोल्हे यांनी सरकारला विचारला.

आपल्या भाषणात रामंमदिर निर्माणाचा उल्लेख करताना डॉ. कोल्हे यांनी प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना झाल्याबद्दल संपूर्ण देशाचे अभिनंदन केले. पण त्याचबरोबर त्याचे भांडवल करणाऱ्या सरकारवर आसूड ओढणारी दीर्घ हिंदी कविता सादर करीत सभागृहाला विचार करण्यासाठी उद्युक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com