esakal | नीट परीक्षा सुरळीत पार; विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
sakal

बोलून बातमी शोधा

नीट परीक्षा सुरळीत पार; विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

नीट परीक्षा सुरळीत पार; विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली ‘नीट परीक्षा’ रविवारी सुरळीत पार पडली. जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयातील प्रश्न तुलनेने अधिक सोपे होते, तर भौतिकशास्त्रातील प्रश्नांची काठिण्य पातळी काहीशी वरचढ होती, असा अनुभव परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सांगितला. तर यंदा नीट परीक्षेचा कट-ऑफ गेल्या वर्षीप्रमाणेच असेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: पवना धरणातून विसर्ग सुरू; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) ही परीक्षा रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळात घेण्यात आली. राज्यात पुणे, मुंबई, नागपूरसह नाशिक, सातारा, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर, जळगाव अशा २२ जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली. राज्यातून जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांनी, तर पुण्यातून सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. कोरोना काळात होणाऱ्या या परीक्षेच्या आयोजनासाठी ‘एनटीए’ने सर्व आवश्यक ती आरोग्यविषयक खबरदारी घेतल्याचे दिसून आले.

परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांना सॅनिटायझर देण्यात येत होते. प्रत्यक्ष परीक्षा दुपारी दोन वाजता सुरू होणार होती, परंतु परीक्षा केंद्रावर दुपारी दीड वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात आला. परंतु विद्यार्थ्यांनी पालकांसह सकाळी अकरा वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रावर हजेरी लावली होती. परीक्षेच्या काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये आणि परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त होता.

‘‘नीट परीक्षेचा २०२०मधील पेपर हा गेल्या काही वर्षांतील सर्वात सोपा पेपर होता. त्या खालोखाल यंदाचा पेपरही सोपा असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. जीवशास्त्र, रसायनशास्त्राचे प्रश्न तुलनेने सोपा होता. तर भौतिकशास्त्रातील बरेच प्रश्न हे विचार करायला लावणारे होते. यंदाचा कट-ऑफ हा गेल्यावर्षीच्या ‘कट-ऑफ’च्या जवळ जाणारा असेल, किंवा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कट-ऑफ केवळ एक ते दोन टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.’’- दुर्गेश मंगेशकर, व्यवस्थापकीय संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र

‘‘नीट परीक्षेचा पेपर काहीसा कठीण असेल, असे अपेक्षित होते. परंतु त्या तुलनेत पेपर सोपा होता. भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रातील प्रश्न मला तुलनेने सोपे वाटले. तर रसायनशास्त्रातील प्रश्न काहीसे कठीण असल्याचे जाणवले.’’- ध्रुव नाईक, परीक्षार्थी

‘‘प्रत्येक विषयाचे प्रश्न हे चांगले आणि विचार करायला लावणारे होते. त्यामुळे काही प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ लागला. भौतिकशास्त्रातील काही प्रश्नांमध्ये कॅलक्युलेशन्स जास्त होत्या. विद्यार्थ्यांना ‘सेक्शन बी’मधील प्रश्न तुलनेने कठीण वाटले. एकूणच परीक्षेची काठिण्य पातळी गेल्यावर्षीपेक्षा अधिक होती.’’- अरुण जैन, केंद्र प्रमुख, एलन करिअर इन्स्टिट्यूट

loading image
go to top