Video : पुणे स्टेशनवर गर्दीचा महापूर

pune railway station
pune railway station

पुणे - हाताला काम नाही, महाविद्यालय बंद, मेसला कुलूप; हॉटेल, चहाच्या टपऱ्या बंद अशी स्थिती निर्माण झाल्याने पुण्यात राहून काय उपयोग, त्यापेक्षा ‘गड्या आपला गाव बरा’ याच विचाराने हजारो नागरिक मिळेल त्या गाडीने पुणे सोडण्यासाठी पुणे स्टेशनवर गेल्याने तेथे गर्दीचा महापूर आला. एकीकडे गावाकडे जायची ओढ, दुसरीकडे गर्दी बघून मनात निर्माण झालेली भीती अशी स्थिती स्टेशनवर पाहायला मिळाली. 

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने उत्तर भारतात जाण्यासाठी ‘पुणे- हावडा’, ‘पुणे- गोरखपूर’, ‘पुणे- पाटणा’ या तीन विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली आहे. पुण्यात उत्तर भारतातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात कुंटुंबंच्या कुटुंबं स्थलांतरित झाली आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांची खाण्यापिण्याची गैरसोय होत आहे. 

परप्रांतीय मजूर बांधकाम साइट, हॉटेल्स, सुरक्षारक्षक यासह अनेक ठिकाणी कामे करतात. पुण्यातील सर्व व्यवहार ठप्प झाल्याने पुण्यात राहून करायचे काय, स्थिती कधीपर्यंत पूर्ववत होईल, रोजगार पुन्हा कधी मिळणार याबाबत काहीच शाश्‍वती नसल्याने परप्रांतीयांचे लोंढे स्वतःच्या राज्यात जाण्यासाठी पुणे स्टेशनवर धडकले आहेत. काही जणांना तात्काळमध्ये आरक्षण मिळाले आहे, पण ज्यांना आरक्षण नाही ते तासन तास रांगेत थांबून तिकीट काढत आहेत. 

गर्दीने धोका वाढला 
एकीकडे गर्दी टाळा असे आवाहन केले जात असताना पुणे स्टेशनवर मात्र छातीस धस्स करावे असे चित्र होते. स्टेशनच्या बाहेरचे आवार, प्लॅटफॉर्म, जिने सर्वच ठिकाणी गर्दी होती. रांगेमध्ये तिकीट काढण्यासाठी दाटीवाटीने नागरिक थांबले होते. काहींनी तोंडाला रुमाल, मास्क लावले, तर काहींनी मात्र काहीच काळजी घेतली नव्हती. 

अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा
वालचंदनगर  ः कोरोनाबाबत अफवा पसरविल्याप्रकरणी एका अज्ञाताविरुद्ध व जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश भंग केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ‘वालचंदनगरमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण’ असा मेसेज टाइप करून त्याखाली जुनी व्हिडिओ क्‍लिप पाठवून अफवा पसरविण्याचा प्रकार घडला. तसेच लाकडीमध्ये दादा शिवदास माकर, किरण दत्मू वनवे व अनिल तात्या वनवे यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेशाचे पालन न करता पानटपऱ्या सुरू ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेलमध्ये कामाला होतो, पण आता कामच बंद झाले, दुसरीकडे कुठेच काम मिळत नाही, त्यामुळे झारखंडला निघून जात आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर पुण्यात येईन.
- इरशाद अन्सारी, झारखंड

पुण्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालय, खाणावळ बंद झाल्यामुळे व पुण्यामधील स्थिती बिघडत असल्याने घरचे गावाकडे बोलवत आहेत. रात्री एक वाजता रेल्वे आहे, त्यासाठी तिकीट काढण्यासाठी तीन तासांपासून थांबून आहे.
- अजित जाधव, उदगीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com