Pune पाटस येथे ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : पाटस येथे ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू

पाटस : दौंड तालुक्यातील पाटस-कुसेगाव मार्गावर पाटस हद्दीत भरधाव वेगात असणाऱया ट्रकने दुचाकीला धडक दिली.या भीषण अपघातात दुचाकीवरील पती,पत्नीसह मुलाचा मृत्यू झाल्याची काळीजपिळवटुन टाकणारी घटना घडली.यावेळी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह,दुचाकी,सोबत पिशवीतील खादय पदार्थ या दृश्याने अनेकांच्या भावना अनावर झाल्या.संतोष सदाशिव साबळे (वय 40),रोहीणी संतोष साबळे (वय 35),गुरु संतोष साबळे (वय 4) राहणार पाटस ता.दौंड जि.पुणे अशी मयतांची नावे आहेत.

दौंड तालुक्यातील अष्टविनायक मार्ग हा वाहन चालकांच्या बेशिस्तपणामुळे मृत्युचा सापळा होत चालला आहे. मागील काही दिवसापासुन पाटस -कुसेगाव मार्गावर किरकोळ अपघातांचा आलेख वाढत आहे. मात्र,शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पाटस हद्दीत कालव्याच्या नजिक भीषण अपघात झाला.

यामध्ये पती,पत्नीसह त्यांच्या मुलाला जिवाला मुकावे लागले. पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार पाटस येथील रहीवाशी संतोष सदाशिव साबळे हे पत्नी रोहीणी व मुलगा गुरु सोबत दुचाकीवरुन कुसेगावहुन पाटस कडे येत होते.पाटस हद्दीत पाठीमागुन भरधाव येणाऱया ट्रकने समोरील दुचाकीच्या पाठीमागच्या बाजुला धडत दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील संतोष व रोहीणी यांचा जागीच मृत्यू झाला.मुलगा गंभीर जखमी होवुन रस्त्यावर तडफडत होता.

नागरीकांनी जखमी व मयतांना दवाखान्यात हलविले.यावेळी उपचारापुर्वीच मुलगा मयत झाला.दरम्यान,अपघाता नंतर ट्रक चालक पळुन गेला.माहीती मिळताच पाटस पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे,सहायक उपनिरीक्षक सागर चव्हाण,समीर भालेराव,सोमनाथ सुपेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेचा पंचनामा करुन मृतदेह विच्छेदनासाठी पाठवुन दिले.यावेळी या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.