

कानगाव, ता. १७ : जनतेच्या विकास निधीतून लाखो रुपये खर्च करून पाटस (ता. दौंड) येथे तयार केलेला सिमेंट रस्ता अवघ्या वर्षभरातच जेसीबीच्या साहाय्याने उखडण्यात आला. यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विकासकामांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाटस-कानगाव रस्त्यालगत पळसे पुनर्वसन पाटस ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक चारमध्ये मागील वर्षी ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातील दलित वस्ती निधीतून दोन टप्प्यांत सिमेंट रस्त्याचे काम केले होते. संबंधित रस्ता मजबूत व चांगल्या दर्जाचा असतानाही सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामासाठी तो पूर्णपणे उखडण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
दरम्यान, पाटस ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी विकासकामांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप केला आहे. “पूर्वी केलेली कामे नष्ट करून त्याच ठिकाणी नव्याने निधी मंजूर करून पुन्हा कामे केली जात आहेत, ठेकेदारांना कामे देऊन आर्थिक भागीदारी साधण्याचा प्रकार सुरू आहे,” असा आरोप नाव न छापण्याच्या अटीवर ग्रामपंचायतीतील एका माजी सदस्याने केला.
एक वर्षापूर्वी दलित वस्ती निधीतून झालेला सिमेंट रस्ता उखडण्यामागे नेमका उद्देश काय, कोणाच्या निर्देशावरून हे काम करण्यात आले? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
सांडपाणी वाहिनीचे काम मी रुजू होण्यापूर्वीचे असून जुनी प्रशासकीय मान्यता असल्याने मला त्याबाबत सविस्तर माहिती नाही.
- दीपक बोरावके, पाटस ग्रामविकास अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.