बारामती तालुक्‍यात कोरोनाची मुंबई मार्गे पुन्हा एन्ट्री...  

corona
corona

मोरगाव (पुणे) : बारामती तालुक्‍यातील मुर्टी येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या अकरावर पोहचली आहे. मात्र, आतापर्यंतच्या दहा रुग्णांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ जण बरे झाले आहेत. त्यामुळे मुर्टी येथील रुग्णामुळे तालुक्‍यात कोरोनाचा पुन्हा प्रवेश झाला आहे. 

मुर्टीतील कोरोनाची लागण झालेली व्यक्ती मुंबई येथे वाशी मार्केटला माथाडी कामगार म्हणून काम करीत होती. तेथून 12 मे रोजी रीतसर पास घेऊन ते आपल्या मूळघरी मुर्टी येथील चिरेखाणवाडी येथे कुटुंबासह आले आहेत. गावात आल्यानंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची व त्याच्या कुटुंबाची तपासणी करून होम क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, संबंधित व्यक्तीला मागील काही दिवसात त्रास सुरू झाला. त्यामुळे बारामती येथे कोरोना तपासणीसाठी दाखल करण्यात आले. रविवारी (ता. 17) रात्री उशिरा तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाला. त्यामुळे प्रशासनाने त्वरित मुर्टी महसुली गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. 

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील सहा जणास कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मुर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल उबाळे यांनी दिली. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. मुर्टी येथील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व लॉकडाउन दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. वडगावचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला असून, नागरिकांनी बाहेर न पडून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

बारामतीच्या ग्रामीण भागात पहिलाच रुग्ण सापडला असून, त्यामुळे गावात भीतीचे वातावरण झाले आहे. गेली दोन महिने लॉकडाउनमुळे या भागातील सर्व कामे ठप्प झाली होती, गेली काही दिवस शेतकऱ्यांसह सर्वच व्यवसाय अडचणीत आले होते. ग्रामपंचायतीने पूर्ण गाव बंद ठेवण्याची भूमिका घेतली होती. गेल्या आठ दिवसात काही दुकाने सुरू ठेवण्यास ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे आता पूर्ण गाव पुन्हा बंद करण्यात आले आहे. 

मोरगाव, मुर्टी, तरडोलीसह प्रत्येक गावात पुणे आणि मुंबई येथे कामासाठी रहात असलेले अनेकजण मुळगावी अजूनही येत आहेत. याची माहिती प्रशासनास देऊन आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रातून तपासणी करून घेण्यासाठी त्या गावातील ग्रामपंचायतीने आणि पोलिस पाटील यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com