पवना धरणाचे मजबुतीकरण केव्हा होणार?

पवना धरणाचे मजबुतीकरण केव्हा होणार?

पवनानगर - मावळवासीयांना आणि पिंपरी-चिंचवडकरांना वरदान ठरलेल्या पवना धरणाच्या मजबुतीकरणाचे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडले आहे. आगामी काळात बंधाऱ्याला धोका झाल्याशिवाय सरकार त्याचे मजबुतीकरण करणार नाही का, असा प्रश्‍न नागरिकांकडून केला जात आहे.

मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिंचवड शहराला पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या पवना धरणाच्या मजबुतीकरणाचे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडले आहे. ४८ वर्षे उलटून गेली तरी पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत पाटबंधारे विभागाने अनेक योजना हाती घेतल्या. त्यामध्ये पवना धरणाची योजना आखण्यात आली. मावळातील शेतीला आणि पिंपरी-चिंचवड व परिसराला औद्यागिक वसाहतीसाठी पाणी आवश्‍यक असल्याने धरणाची योजना पुढे आली. २००४ मध्ये पवना धरणाच्या मजबुतीकरणासाठी २२ कोटींचा निधी मंजूर केला. आक्‍टोबर २००४ ते नोव्हेंबर २००६ पर्यंत महालक्ष्मी कन्स्ट्रक्‍शनने पक्‍क्‍या बंधाऱ्याची गळती थांबविण्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे मोठी गळती थांबविण्यात यश आले. पुनर्वसन होत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत धरणग्रस्तांनी घेतली आणि मजबुतीकरणाचे काम बंद पाडले. पवना धरणासाठी शासकीय आकडेवारीनुसार ६१९७ एकर क्षेत्र संपादित करण्यात आले. यात १२०३ खातेदार बाधित झाले. यापैकी ३४० खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन देऊन पुनर्वसन करण्यात आले. उर्वरित ८६३ खातेदार अजूनही न्यायासाठी लढत आहेत. परंतु, पुनर्वसनासाठी सरकार अजून किती वर्ष वाट पाहणार, असा प्रश्‍न नागरिक करीत आहेत. 

पवना धरणग्रस्त समितीचे सचिव दत्तात्रेय ठाकर म्हणाले, ‘‘पवना धरणाच्या मजबुतीकरणाबरोबर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य द्यावेत. धरणग्रस्तांच्या पुनर्वसन प्रश्‍नाला प्राधान्य देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आहे. पुनर्वसन लांबल्याने अनेक प्रश्‍न वाढले आहे.’’

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रकिया सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत धरणग्रस्त पुनर्वसन आणि धरणाच्या मजबुतीकरणाचे काम करण्याचे निश्‍चित झाले आहे. परंतु, ठेकेदाराने प्रशासकीय बाबी पूर्ण न केल्याने ते काम रेंगाळले आहे. तांत्रिक अडचणी सोडवून हे काम लवकरच सुरू होईल.
- अशोक शेटे, उपविभागीय अभियंता

पवना धरणाबाबत.....
धरणाचे बांधकाम १९६३ मध्ये सुरू
धरण १९७२ मध्ये पूर्ण
धरणाची लांबी ५५७७ फूट
धरणाची उंची ११९ फूट
मातीचा बांध ४६२७ फूट
दगडी सिंमेट बांधकाम ९५० फूट
धरणात एक लाख सात हजार ४३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com