कर भरा; सवलतीत औषधे मिळवा 

जनार्दन दांडगे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

शंभर टक्के ग्रामपंचायत कर भरणाऱ्या कुटुंबाला वर्षभर लागणारी सर्व प्रकारची औषधे सवलतीच्या दरात मिळावीत, यासाठी "ना नफा ना तोटा' या तत्त्वानुसार ग्रामपंचायतीच्या मालकीचे औषधाचे दुकान सुरू करण्याबरोबरच, महिलांच्या सुरक्षिततेसाठी चौकात सीसीटीव्ही बसविणे व एकच मुलगी असणाऱ्या कुटुंबांना दहा हजार रुपये मदत करणे, असे महत्त्वपूर्ण ठराव कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आले.  

लोणी काळभोर (पुणे) : शंभर टक्के ग्रामपंचायत कर भरणाऱ्या कुटुंबाला वर्षभर लागणारी सर्व प्रकारची औषधे सवलतीच्या दरात मिळावीत, यासाठी "ना नफा ना तोटा' या तत्त्वानुसार ग्रामपंचायतीच्या मालकीचे औषधाचे दुकान सुरू करण्याबरोबरच, महिलांच्या सुरक्षिततेसाठी चौकात सीसीटीव्ही बसविणे व एकच मुलगी असणाऱ्या कुटुंबांना दहा हजार रुपये मदत करणे, असे महत्त्वपूर्ण ठराव कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आले. 

सरपंच गौरी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली "आमचा गाव आमचा विकास' उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी ग्रामसभा झाली. या वेळी शंभर टक्के कर भरणाऱ्या कुटुंबाला वर्षभर सवलतीच्या दरात औषधे मिळावीत, यासाठी पंधराव्या वित्त आयोग विकास आराखड्यामध्ये ग्रामपंचायतीचे स्वमालकीचे मेडिकल स्टोअर उभारण्याचा ठराव भाजप कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी मांडला. त्यास उपस्थित ग्रामस्थांनी एकमताने मंजुरी दिली. 

सरपंच गायकवाड म्हणाल्या, ""ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न साडेसहा कोटींवर पोचले असून, वसुली मात्र 50 टक्‍क्‍यांच्या आतच आहे. वसुलीसाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामपंचायतीची अनेक कामे रखडली आहेत. पंधराव्या वित्त आयोगाचा पंचवार्षिक आराखडा पाहता उत्पन्नात वाढ होण्याची गरज आहे. करवसुली समाधानकारक झाल्यास गावातील कामे अपेक्षित गतीने पूर्ण करता येतील. यामुळे नागरिकांनी कर त्वरित भरावा.'' 

ग्रामपंचायत हद्दीतील चौकात महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे, यासाठी एका मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबांना दहा हजार तर दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्यास पाच हजार रुपये बक्षीस देणे, विकासकामे तातडीने पूर्ण करणे, असे ठराव मंजूर करण्यात आले. 
या वेळी साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष काळभोर, प्रवीण काळभोर, गणपतराव चावट, अशोक कदम, अशोक शिंदे यांच्यासह पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, माजी सरपंच नंदू काळभोर, उपसरपंच बाबासाहेब काळभोर, माजी उपसरपंच ऋषी काळभोर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण देसाई तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pay taxes and get discounts on drugs ..