esakal | "आदर्श शिक्षका'साठी महापालिकेने ठरविले नवीन निकष 
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC sets new criteria for ideal teachers

महापालिकेचा "आदर्श शिक्षक' पुरस्कार आपल्याला मिळावा, असे तुम्हाला वाटत असल्यास तुमच्या शाळेचा वा वर्गाचा निकाल 100 टक्के हवा. तुमच्या शाळेत डिजिटल क्‍लासरूम हवी. अल्पबचत, कुटुंबकल्याण अशा कामांसाठी तुम्हाला पुरस्कार मिळालेले हवेत.

"आदर्श शिक्षका'साठी महापालिकेने ठरविले नवीन निकष 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेचा "आदर्श शिक्षक' पुरस्कार आपल्याला मिळावा, असे तुम्हाला वाटत असल्यास तुमच्या शाळेचा वा वर्गाचा निकाल 100 टक्के हवा. तुमच्या शाळेत डिजिटल क्‍लासरूम हवी. अल्पबचत, कुटुंबकल्याण अशा कामांसाठी तुम्हाला पुरस्कार मिळालेले हवेत. यंदाच्या "आदर्श शिक्षक' पुरस्कारासाठी शालेय शिक्षण विभागाने असे निकष लावले आहेत. त्यामुळे पुरस्कार मिळविण्यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या 21 निकषांची परीक्षा द्यावी लागणार आहे. या निकषांचे अनेकांनी स्वागत केले, तरी काही शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी टीकेचा लाल शेरा मारल्याने यावरून शिक्षकांमध्ये चर्चेचे तास भरू लागले आहेत. 

प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापकांना पुरस्कारांसाठी समान निकष ठरवून दिले आहेत. त्यात 21 निकष असून, प्रत्येकास 150 गुण तर आदर्श शाळेसाठी 150 गुण ठेवले आहेत. त्यासाठी 15 निकष असून, प्रत्येकी 10 गुण दिले आहेत. या निकषांत देणग्या जमा करणे, शैक्षणिक संशोधनपर निबंध प्रसिद्धी, प्रथितयश नियतकालिक किंवा वृत्तपत्रातील लेखन, प्रथितयश प्रकाशकाने प्रसिद्ध केलेले पाच ग्रंथ, शिक्षण हक्क कायद्यातील 10 घटकांपैकी विशिष्ट घटकांची पूर्तता, अशा निकषांचा समावेश आहे. शिक्षक ज्या वर्गाला शिकवतो किंवा जो विषय शिकवतो, त्याचा 100 टक्के निकाल नसल्यास त्याचा या पुरस्कारासाठी विचारही केला जाणार नाही. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नव्या निकषांचे अनेक शिक्षकांकडून स्वागत होत असले, तरी अनेक मुद्दे वादाचे ठरले आहेत. त्याचा पुनर्विचार होणे गरजेचे असल्याचे मत काही शिक्षकांचे आहे. 

असे होते जुने निकष... 
मान्यताप्राप्त शाळेत सहायक शिक्षकांसाठी सलग 15 वर्षे, तर मुख्याध्यापकांसाठी कमीत कमी 20 वर्षे सेवा ही किमान पात्रता होती. विद्यार्थिगळती रोखण्यासाठी, निकाल वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, नव उपक्रम, परिणामकारक वर्ग अध्यापन, बुद्धिमान व कमकुवत विद्यार्थ्यांकरिता केलेले प्रयत्न, सेवांतर्गत प्रशिक्षण, पुरस्कार, बक्षिसे, लेखन, समीक्षण, अभ्यासक्रमपूरक वा अभ्यासेतर उपक्रम, शाळेच्या भौतिक विकासासाठी संघटन, याचाही विचार करण्यात येत होता. 

मुहूर्त हुकणार? 
सध्या "आदर्श शिक्षक' पुरस्काराकरिता पात्र शिक्षकांकडून प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांचे नव्या निकषांनुसार मंगळवारपर्यंत (ता. 27) प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना नव्याने प्रस्ताव सादर करावे लागत आहेत. जुन्या निकषांनुसार प्रस्तावासाठी केलेली मेहनत पाण्यात गेली, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने व्यक्त केली. तसेच, निवड झालेल्या शिक्षकांना मुलाखत, कामाचे सादरीकरण, अशा परीक्षाही प्रशासन अधिकाऱ्यांसमोर द्याव्या लागणार आहेत. तसेच, 5 सप्टेंबरचा घोषणेचा मुहूर्त साधणार कसा, असा प्रश्‍न आहे. 

वशिल्यातून नव्हे, तर शिक्षकांची निवड अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, यासाठी निकष बदलले आहेत. आदर्श शिक्षकांची निवड या पुरस्काराकरिता व्हावी, यासाठी शिक्षणतज्ज्ञांनी चर्चा करूनच हे निकष ठरविले आहेत. 
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण 

loading image
go to top