esakal | अतिक्रमणग्रस्त पुण्यात साजरा होणार पादचारी दिन
sakal

बोलून बातमी शोधा

Murlidhar-Mohol

अतिक्रमणग्रस्त पुण्यात साजरा होणार पादचारी दिन

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - रस्ते, पादचारी मार्गावरील अतिक्रमण, बेशिस्त पार्किगमुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा मिळत नसताना आता पुणे महापालिकेने पादचाऱ्यांच्या सन्मानासाठी ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन पुढील काळात जाहीर जाणार आहेत. पादचाऱ्यांसाठी अडथळे ठरणारे अतिक्रमण व इतर समस्या दूर केल्या जातील असे आश्‍वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे.

शहरात वाढलेली प्रचंड वाहतूक, अतिक्रमण यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांवर जीव मुठीत धरून चालावे लागते. शहरात दरवर्षी अनेक पादचाऱ्यांचा अपघातामध्ये मृत्यू देखील होतो.

महापालिकेतर्फे पादचाऱ्यांसाठी पादचारी मार्ग, भुयारी मार्ग, पूल तयार केले जात असले तरी या सुविधा नागरिकांसाठी अपुऱ्या आहेत. रस्ता रुंद केला किंवा पादचारी मार्ग मोठा केला तरी त्यावर पथारी, टपऱ्या, स्टॉलचे अतिक्रमण झालेले आहे. अनेक ठिकाणी तर राजकीय कार्यकर्त्यांचे कार्यालय थाटलेले आहेत. मुख्य रस्त्यांवर सर्रास चारचाकी पार्क केलेल्या असतात. या अडचणींमुळे ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच पादचाऱ्यांना चालताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे गुरुवारपासून होणार खुली; डॉ. राजेश देशमुख

शहरातील अशी स्थिती असताना दुसरीकडे महापालिकेने ११ आॅक्टोबर रोजी पादचारी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या नियोजनाची बैठक महापालिकेत झाली असू, यामध्ये सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मोहोळ म्हणाले, ‘‘पादचारी प्रथम’ या अनुषंगाने पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. हा केवळ एका दिवसाचा इव्हेंट न राहाता शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून याचे नियोजन केले जाणार आहे. नागरिकांना पादचारी मार्ग, रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग, बंद पडलेले भुयारी मार्ग सुरू करणे, तेथे वीज व सुरक्षा पुरविणे अशा सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यासाठी सामाजिक संस्थांना सोबत घेतले जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून ११ डिसेंबर रोजीच्या उपक्रमांचे नियोजन केले जाईल.

रस्त्यावर, पादचारी मार्गावरील अतिक्रमणांबद्दल मोहोळ म्हणाले, पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षीत मार्ग आवश्‍यक आहे, त्यामुळे अतिक्रमण काढले जाईल. शहरात १०० किलोमीटरचे पादचारी मार्ग बांधले जात आहेत, त्यापैकी ३५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. नागरिकांना सुरक्षीत पणे चालता यावे यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

loading image
go to top