मिठाई आणि फरसाणची दुकाने पुन्हा सुरू करण्यास परवानगी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

लॉकडाउनमुळे मिठाई आणि फरसाण अशा आवडीच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांना घेता आला नाही. परंतु, सरकारने काही नियमावलीनुसार मिठाई आणि फरसाणची दुकाने पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. सध्या ४० ते ५० टक्के व्यवहार होत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा गुलाबजाम, बर्फी, पेढे, रसगुल्लेचा खमंग वास दरवळू लागला आहे.

पुणे - लॉकडाउनमुळे मिठाई आणि फरसाण अशा आवडीच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांना घेता आला नाही. परंतु, सरकारने काही नियमावलीनुसार मिठाई आणि फरसाणची दुकाने पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. सध्या ४० ते ५० टक्के व्यवहार होत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा गुलाबजाम, बर्फी, पेढे, रसगुल्लेचा खमंग वास दरवळू लागला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर लग्नसराईचे सोहळे होत आहेत. परंतु, काही ठरावीक लोकांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्यांमध्ये पूर्वीच्या तुलनेत केवळ ’लिमिटेड’ मिठाईच्या ऑर्डर मिळत आहेत. लॉकडाउन पूर्वी नागरिक मोठ्या संख्येने फरसाण,मिठाईच्या खरेदीस येत होते. सध्या म्हणावी तशी गर्दी दुकानात नाही. पण, पहिल्यापेक्षा चित्र अधिक सकारात्मक आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्पन्न मिळण्यास सुरुवात
लॉकडाउनमध्ये सर्व काही बंद होते. मिठाई आणि फरसाण दुकानांचे उत्पादनही थांबले होते. मात्र, आता दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने उत्पन्नास सुरवात होत असल्याने दिलासा मिळत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. पुन्हा पूर्वी प्रमाणे खरेदीत आणखीन वाढ होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

सध्या दुकाने सुरू तर झाली असून ५० टक्के व्यवहार सुरळीत झाला. लॉकडाउनमध्ये दुकाने बंद असल्याने उलाढाल बंद होती. आता दुकाने सुरू झाल्याने व्यवहाराला चालना मिळत आहे. शनिवारी व रविवारी ग्राहकांची संख्या थोडी वाढते. तसेच पी १ आणि पी २ बाबत अद्याप काही दुकानदारांमध्ये मोठे संभ्रम निर्माण झाले असून याबाबत स्पष्टता मिळाल्यास आम्हाला त्याचा फायदा होईल.
- समीर गाडवे, काका हलवाई

सध्या व्यवहाराला म्हणावी तशी चालना नाही. परंतु, दुकान सुरू झाल्यामुळे लोकांना हवे असलेले खाद्यपदार्थ मिळत आहेत. ग्राहकांकडून फरसाणला चांगली पसंती मिळत आहे. तसेच लोकांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर पण ठेवले असून सुरक्षित अंतर ठेवून ग्राहक खरेदीस प्राधान्य देत आहेत. फरसाण आणि वेफर्ससाठी लोक आवर्जून येत आहेत. सरकारने निश्‍चित केलेल्या वेळेतच दुकान सुरू ठेवण्यात येत आहेत.
- रवी बुधानी, बुधानी वेफर्स

दुकानांना उघडण्याची परवानगी मिळाली आहे, हे साध्य महत्त्वाचे आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेतच दुकान सुरू असते. आमच्या २० शाखा आहेत. हळूहळू पुन्हा सगळं काही पूर्वी प्रमाणे लवकरच सुरू होईल, असा विश्वास आहे.
- केदार चितळे, चितळे बंधू

सरकारच्या सर्व नियमावलींचे कोटेकोरपणे पालन करत आहे. तसेच फोन वरूनही ऑर्डर घेतली जाते. संबधित व्यक्‍तीच्या घरी खाद्यपदार्थ पोचविण्यात येत आहेत. तसेच दुकानातही सर्व काळजी घेतली जाते.
- चंदन गुप्ता, गुप्ता भेळ अँड फरसाण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission to reopen sweet and farsan shops