वनामकृवित कीटनाशक अवशेष चाचणी, विश्लेषण प्रयोगशाळा स्थापन

वनामकृवित कीटनाशक अवशेष चाचणी, विश्लेषण प्रयोगशाळा स्थापन
Published on

‘वनामकृवि’त कीटकनाशक अवशेष
चाचणी, विश्लेषण प्रयोगशाळा स्थापन

आज कृषिमंत्री भरणे यांच्या हस्ते उद्‍घाटन

ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागात प्रगत कीटकनाशक अवशेष चाचणी व विश्लेषण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. आज (ता. १५) दुपारी अडीच वाजता कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रयोगशाळा आणि देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाले पीक परिसंवादाचे उद्‍घाटन होणार आहे, अशी माहिती कृषी कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिली.
नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या प्रयोगशाळेसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (आरकेव्हीवाय) ८ कोटी ६३ लाख २ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी प्रादेशिक उत्कृष्टता केंद्र म्हणून ही प्रयोगशाळा कार्य करणार आहे. अवशेषमुक्त कृषी उत्पादनाला चालना देणे, ग्राहकांचा विश्वास वृद्धिंगत करणे, निर्यातक्षम दर्जेदार उत्पादनास प्रोत्साहन देणे आणि शाश्वत कृषी विकासासाठी वैज्ञानिक आधार उपलब्ध करून देणे, यामध्ये प्रयोगशाळेचे महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे.
ISO/IEC १७०२५:२०१७ मानकांनुसार एनएबीएल मान्यता प्राप्त करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार विश्लेषण सेवा उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. प्रयोगशाळेत अत्याधुनिक उच्च क्षमतेची उपकरणे तसेच नमुना प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण आणि प्रयोगशाळा सुरक्षा यासाठी आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. फळे, भाजीपाला, धान्ये, कडधान्ये, तेलबिया, माती, पाणी आणि इतर कृषी नमुन्यांतील कीटकनाशक अवशेषांचे अत्यंत अचूक व विश्वासार्ह विश्लेषण राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करता येणार आहे.
शेतकरी, संशोधक, कृषी विद्यापीठे, शासकीय विभाग, अन्न प्रक्रिया उद्योग, निर्यातदार आणि नियामक संस्थांना कीटकनाशक अवशेष विश्लेषण, अन्न गुणवत्ता परीक्षण, अवशेष निरीक्षण, अवशेष क्षय (रेसड्यू डिसिपेशन) अभ्यास, पर्यावरणीय निरीक्षण तसेच संशोधन व प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाले पीक परिसंवाद
कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात आज (ता. १५) दुपारी देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाले पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे आणि कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


पूर्ण.....१४-०८-२०२६..............................१०.०५...(रासवे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com