

पिंपरी, ता. ११ : कायद्यानुसार एका ऑटो परमिटवर एकच ऑटो रिक्षा नोंदणी होऊ शकते. मात्र, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात परमिटपेक्षा रिक्षांची जास्त नोंदणी झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरात सुमारे ४८ हजार ऑटो परमिट वितरित करण्यात आले आहेत. तर, नोंदणी मात्र ५२ हजारांपेक्षा अधिक ऑटो रिक्षांची झाली आहे. त्यामुळे याची माहिती आरटीओकडे आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात २०१७ पासून ‘ओपन परमिट’ प्रणाली सुरू करण्यात आली. त्यामुळे मागेल त्याला परमिट देण्यात आले. अगदी राज्यासह परराज्यातील अर्जदारांना परमिट देण्याचा धडाकाच सुरू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये जिथे पाच हजार रिक्षा होत्या, तिथे आज ५२ हजार रिक्षा धावत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडसारख्या शहरांमध्ये रिक्षांची संख्या गेल्या नऊ वर्षांत तब्बल सहापटीने वाढली. त्यावर ऑटो रिक्षा परमिट बंद करण्याची मागणी विविध रिक्षा संघटनांनी परिवहन विभागाकडे केली. त्या अनुषंगाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ९ मार्च रोजी परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुक्त रिक्षा परवाना तात्पुरते स्थगित करण्याचे आदेश दिले. पण, शहरात २०१७ पूर्वी एका परमिटवर अनेक रिक्षांची नोंदणी झाल्याची बाब समोर आली आहे.
नोंदणीतही तफावत
पिंपरी चिंचवड शहरात २०२१ पासून ऑटो रिक्षा परमिट आणि नोंदणी यामध्ये तफावत दिसून येते. २०२२ आणि २०२३ या दोन वर्षी रिक्षांच्या नोंदीपेक्षा परमिट संख्याची नोंद अधिक झाली आहे. तर २०२१, २०२४,२०२५ आणि २०२६ या वर्षी परमिटपेक्षा रिक्षांची अधिक नोंद झाली आहे. जर एका परमिटवर एक रिक्षा नोंद होत असेल, तर आकडेवारीत फरक कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंजुरी आवश्यकच
महाराष्ट्रात नवीन ऑटोरिक्षा खरेदी करण्यासाठी आणि ती रस्त्यावर व्यावसायिक स्वरूपात चालवण्यासाठी रिक्षा परमिट बंधनकारक आहे. आरटीओच्या नियमांनुसार, नवीन रिक्षाची नोंदणी करण्यापूर्वी वैध परमिट किंवा परमिट मंजुरीचे पत्र असणे आवश्यक आहे.
आकडे काय सांगतात
वर्षे ः परमिट ः रिक्षा नोंदणी
२०२६ ः ३,०७५ ः ३,१८१
२०२५ ः ६,८२६ ः ६,९१०
२०२४ ः ५,७५६ ः ६,२८८
२०२३ ः ६,२१२ ः ६,०८३
२०२२ ः ३,८५९ ः ३,५६२
२०२१ ः २,१५० ः २,४०१
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर आरटीओच्या वायूवेग पथकांमार्फत कारवाई करण्यात येत आहे.
- राहूल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.