पिंपरी-चिंचवड शहरात आणखी तीन बीआरटी रोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पिंपरी - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तीन बीआरटी मार्गांचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये कस्पटे वस्ती-काळेवाडी फाटा, हाय कपॅसिटी मास ट्रांझिस्ट रोड (एचसीएमटीआर) आणि चिंचवड ते तळवडे या रस्त्यांचा समावेश आहे. महापालिकेने उभारलेल्या बीआरटी रस्त्यांना पीएमआरडीएचे बीआरटी रोड जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. 

पिंपरी - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तीन बीआरटी मार्गांचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये कस्पटे वस्ती-काळेवाडी फाटा, हाय कपॅसिटी मास ट्रांझिस्ट रोड (एचसीएमटीआर) आणि चिंचवड ते तळवडे या रस्त्यांचा समावेश आहे. महापालिकेने उभारलेल्या बीआरटी रस्त्यांना पीएमआरडीएचे बीआरटी रोड जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. 

पीएमआरडीएने पुणे क्षेत्रासाठी तयार केलेल्या कॉम्प्रेंसिव मोबिलिटी प्लॅन अर्थात सर्वंकष कृती आराखड्याचे (सीएमपी) सादरीकरण बुधवारी (ता. २८) आकुर्डी येथील कार्यालयात झाले. त्या वेळी पीएमआरडीएने शहरात प्रस्तावित केलेल्या तीन बीआरटी मार्गांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पीएमआरडीएच्या सहा हजार १८ चौरस किलोमीटर क्षेत्रात शहराच्या २१० चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश होतो. सध्या शहरातील सार्वजनिक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपीएमएल) सुमारे दीड हजार बस कमी आहेत. त्यामुळे खासगी वाहन वापरण्याकडे नागरिकांचा कल आहे. रस्ते आणि वाहनांची संख्या यांचे प्रमाण खूपच व्यस्त असल्याने बहुतांश रस्त्यांवर रोज वाहतूक कोंडी होत असते. त्यातून मार्ग काढण्यासाठी पीएमआरडीए व महापालिकेने वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पीएमआरडीएने सीएमपी तयार केला आहे. त्यात शहरातील तीन बीआरटीएस मार्गांचा समावेश आहे. 

सीएमपी आराखडा
पीएमआरडीएच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यामध्ये रेल्वे व बस या सार्वजनिक वाहतूक योजनांवर भर दिला आहे. सध्या एकूण वाहतूक वर्दळीच्या ७१ टक्के वाटा खासगी मोटारी व दुचाकींचा आहे. बस आणि रिक्षांचा वाटा २९ टक्के आहे.

खासगी वाहनांची वाढती संख्या विचारात घेतल्यास पुढील २० वर्षांत वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसणार आहे. तसे होऊ नये, यासाठी पीएमआरडीएने सर्वंकष वाहतूक आराखड्यामध्ये पुढील २० वर्षांचे धोरण ठरविले आहे. त्याचे २०१८ ते २०२८ आणि २०२८ ते २०३८ असे दोन टप्पे केलेले आहेत. त्यानुसार आर्थिक व तांत्रिक क्षमतांच्या आधारे उद्दिष्ट साध्य करण्याचे नियोजन केले आहे. 

सध्याची स्थिती
महापालिकेने काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्ग उभारला आहे. मात्र, अद्याप त्यावरून बससेवा सुरू झाली नाही. काळेवाडी फाटा येथे पीएमआरडीएकडून प्रस्तावित कस्पटे वस्ती ते काळेवाडी फाटा बीआरटी मार्ग जोडण्यात येणार आहे. चिंचवड येथून तळवडे येथे जाण्यासाठी आकुर्डी खंडोबा माळ, निगडी, त्रिवेणीनगर आणि आकुर्डी खंडोबा माळ, थरमॅक्‍स चौक, त्रिवेणीनगर असे दोन मार्ग उपलब्ध आहेत. एचसीएमटीआर मार्ग निगडी, स्माइन रोड, नाशिक महामार्ग, भोसरी, कासारवाडी नाशिक फाटा, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, थेरगाव, चिंचवड, वाल्हेकरवाडी, आकुर्डी प्राधिकरण निगडी असा आहे. वाल्हेकरवाडी येथील नागरिकांचा या रस्त्याला विरोध आहे. 

Web Title: Pimpri Chinchwad City Three BRT Road