पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्पाविषयी अनास्था?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

कचराकुंडीची उपलब्धता, पदपथ, रस्त्यांचे डांबरीकरण, दिवे लावणे, सिग्नल बसविणे, बस स्थानक उभारणे, सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणे, ज्येष्ठांसाठी बैठकव्यवस्था, विरंगुळा केंद्र, उद्यानांतील सुधारणा आदी कामे नागरिकांनी सुचविली आहेत.
- जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखाधिकारी

पिंपरी - नागरिकांना त्यांच्या सोईनुसार सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी दहा लाखांपर्यंतची कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी केले. त्याचा अंतर्भाव अर्थसंकल्पात करण्यात येणार होता. त्यानुसार ३० लाख लोकसंख्येच्या शहरातून अवघ्या २१ सूचना आल्याने नागरिकांचा महापालिका प्रशासनावर विश्‍वास नाही की शहराविषयी अनास्था आहे, अशी शंका येण्यास वाव आहे; तसेच प्रशासन नागरिकांपर्यंत पोचले की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी महापालिकेतर्फे २००७-०८ पासून नागरिकांकडून सूचना मागविल्या जात आहेत. त्यांनी सुचविलेल्या कामांचा समावेश अर्थसंकल्पात केला जातो. अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी साधारणतः पाच-सहा महिने आधी नागरिकांकडून सूचना मागविण्यात येतात. विविध विकासकामे अधिक चांगल्या पद्धतीने व्हावीत, योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग वाढावा, त्यांचे लक्ष असावे, अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा, हा त्यामागील उद्देश. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रशासनाकडे आलेल्या सूचनांवरून दिसते. 

नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा व त्यासाठीच्या तरतुदींचा समावेश अर्थसंकल्पात करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील आठवड्यात अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर मांडला जाणार आहे. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांकडे नागरिकांनी कामे सुचवायची असतात. ही माहिती क्षेत्रीय कार्यालयांकडून स्थापत्य विभागाकडे व त्यांच्यामार्फत लेखा विभागाकडे पाठविली जाते. त्यानंतर अर्थसंकल्पात या कामांचा समावेश केला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad Municipal Budget Awareness